Maharashtra New COVID-19 Travel Guidelines: जगभरात कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा उद्रेक; महाराष्ट्र सरकारने जारी केले नवीन निर्बंध
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नवीन आणि आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक प्रकाराने जगभरात चिंता वाढवली आहे. नवीन प्रकाराचा वाढता कहर पाहता महाराष्ट्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही देशातून राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना यासंदर्भात केंद्राच्या सूचनांचे पालन करावे लागेल. राज्यात प्रवेश करणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांना एकतर कोरोना लसीकरणाची दोन्ही प्रमाणपत्रे दाखवावी लागतील किंवा 72 तासांपूर्वीचा RTPCR निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल.

याआधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, लोकांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची चिंता आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जाईल आणि पूर्ण तपासणी करून जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोना नियमांचे पालन न करणारी व्यक्ती टॅक्सी/खासगी वाहतूक चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये आढळून आल्यास, त्याला 500 रुपये दंड, तर ड्रायव्हर/हेल्पर/कंडक्टरलाही रु. 500 दंड आकाराला जाईल. बसेसच्या बाबतीत, वाहतूक एजन्सीच्या मालकास 1000 रुपये दंड आकारला जाईल.

जर एखाद्या व्यक्तीने संस्थेतील नियमांचे पालन केले नाही, तर त्या व्यक्तीला 500 रुपयांच्या दंडासोबतच संस्थेला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाईल. नियमाचे वारंवार उल्लंघन केल्यास पुढील अधिसूचना येईपर्यंत अशा संस्था बंद केल्या जातील. राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे की, दुकाने, मॉल्स आणि कार्यक्रमांमध्ये लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच येथे येणाऱ्या लोकांचेही संपूर्ण लसीकरण झाले पाहिजे. केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांनीच सर्व सार्वजनिक वाहतूक वापरावी. (हेही वाचा: Omicron Variant: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत)

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत सरकार पूर्णपणे सतर्क झाले असून त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही राज्यांना दिल्या आहेत. मात्र दुसर्‍या लाटेनंतर दोन तृतीयांश लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे, त्यामुळे जास्त कहर होण्याची शक्यता नाही. जगभरात कोरोनाची प्रकरणे वाढत असतानाही त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या घटत आहे.