Omicron Variant: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत
Ajit Pawar | (Photo Credits: ANI)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सरकारने बरेचसे निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे राज्य पूर्वपदावर येणार अशी स्थिती असतानाच राज्यात पुन्हा निर्बंध लावले जाण्याची चिन्हे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तसे संकेत दिले. करोनाच्या ओमिक्रोन (Omicron Variant) या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातील प्रमुख वैद्यकीय संस्था एम्सनेही या व्हेरिएंटला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भविष्यात नजीक येऊन ठेपलेले कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट थोपविण्यासाठी राज्य सरकारनेही हालचाली सुरु केल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला नियंत्रणात ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, गरज पडल्यास राज्यात पुन्हा निर्बंध लावावे लागू शकतात असे संकेतच अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या दिले.

दरम्यान, विदेशातून थेट महाराष्ट्रात येणाऱ्या विमानांबाबत राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. पुणे येथील कोरोना आढावा बैठकीत अजित पवार बोलत होते. या वेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, जगभराच्या तुलनेत आपल्याकडे स्थिती चांगलीच आहे. जागतीक पातळीचा विचार करता नव्या व्हेरिएंटचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे पाहून बंधने हळूहळू उठवली जात आहेत. जिल्ह्यातील समारंभाची बंधने 50% हटवली आहेत. शाळासुद्धा पूर्ण क्षमतेने सुरु होत आहेत. येत्या 1 डिसेंबपासून सिनेमागृहंसुद्धा पूर्ण क्षमतेने सुरु होतील, असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: 'डेल्टा'पेक्षाही धोकादायक कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron; जगासमोर नवे आव्हान, घ्या जाणून)

दरमयान, दक्षिण अफ्रीकेत कोविड-19 च्या नव्या रुपायत आढळलेल्या व्हेरिएंटने जगासमोरील चिंता वाढवली आहे. जगभरातील अनेक देशांनी या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या एका समितीने कोरोना व्हायरसच्या या नव्या रुपास ‘ओमीक्रॉन' असे नाव दिले आहे. हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक आणि चिंताजनक असल्याचेही म्हटले आहे.

ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, रशिया आणि इतरही अनेक देशांसोबत यूरोपीय संघाने आफ्रिकी देशांतून येणाऱ्या लोकांवर प्रतिबंध लावले आहेत.

भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. पाठिमागील 24 तासात संपूर्ण भारतात 8,318 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. एकेकाळी हा आकडा दीड ते दोन लाखांच्या आसपास असायचा. भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांची बरे होण्याची संख्याही जवळपास 3,39,88,797 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाबाबत सकारात्मक गोष्टी पुढे येत असतानाच नव्या व्हेरिएंटने चिंता निर्माण केली आहे.