महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Assembly Election 2024) मधील प्रक्रियेत आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि राजकीय वर्तुळात काहीसा नाट्यपूर्ण घडामोडींचा असणार आहे. जागावाटप हा मुद्दा बऱ्यापैकी घोंगडे भिजत ठेवणारा असला तरी, आज सर्वच राजकीय पक्षांतील प्रमुख नेते निवडणूक अर्ज दाखल (Vidhan Sabha Election Nomination) करणार आहेत. ज्यामध्ये जयंत पाटील (Jayant Patil), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), जितेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासाख्या नेत्यांचा समावेश आहे. हे सर्व नेते आज दिवसभरात निश्चित वेळेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिवसभरात अर्ज दाखल करणाऱ्या सर्व नेत्यांची संख्या जवळपास 45 इतकी आहे. जाणून घ्या कोणता नेता कोणत्या मतदारसंघातून दाखल करणार उमेदवारी अर्ज.
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे दिग्गज
- वरळी विधानसभा मतदारसंघ: या मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाकडून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या वेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासह बंधू तेजस आणि पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा, Mahim Vidhan Sabha: माहिमचा हलवा कोणाचा? उद्धव ठाकरे यांचा उमेदवार मैदानात; सदा सरवणकर आणि मनसे प्रमुखांच्या चिरंजीवांसमोर आव्हान)
- इस्लामपूर विधनसभा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या मतदारसघातून निवडणूक अर्ज दाखल करत आहेत.
- कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ: जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे समजते.
- बीड विधानसभा मतदारसंघ: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून 38 उमेदवारांची पहिली यादी; अजित पवार बारामती मधून रिंगणात)
- ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ: अतिशय बहुचर्चित अशा या मतदारसंघातून माजी खासदार राजन विचारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनसे पक्षाकडून अविनाश जाधव हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
- येवला विधानसभा मतदारसंघ: अजित पवार यांच्या पक्षाकडून छगन भुजबळ हे येथे अर्ज दाखल करत आहेत.
- कोथरुड विधानसभा मतदारसंघ: भाजप नेते चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
- इंदापूर विधानसभा मतदारसंघ: राजकीय दृष्ट्या हायहोल्टेज आणि अतिशय चर्चित ठरलेल्या इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी दाखल करत आहेत.
- इंदापूर - इंदापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या पक्षाकडून हर्षवर्धन पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नुकतेच त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षात प्रवेश केला आहे.
दरम्यान, संग्राम थोपटे भोर येथून, दिलीप वळसे पाटील: आंबेगाव येथून निवडणूक अर्ज दाखल केला जात आहे. आज मुहूर्त चांगला असल्याने राजकीय नेते आजच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्राधान्य देत असल्याचे समजते.