PM Narendra Modi (photo Credit - Twitter)

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (Lokmanya Tilak Smarak Trust) कडून दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. परंतू नरेंद्र मोदींच्या नावाला कॉंग्रेस कडून विरोध करण्यात आला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लोकमान्य टिळक यांच्या विचारांशी कधीपासून जुळायला लागले,' असा सवाल करत डॉ. रोहित टिळक (Dr. Rohit Tilak) यांच्याविषयी शहर आणि प्रदेश काँग्रेसने तक्रार केली आहे. रोहित टिळक काँग्रसचे पदाधिकारी होते, त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर कसबा विधानसभेची निवडणूकही लढवली होती. टिळक कुटुंबियांचा काँग्रेसने कायमच सन्मान राखल्याचा दावा करत प्रदेश काँग्रेसने या पुरस्काराविषयी तीव्र नाराजी दर्शवली आहे.

जयंतराव टिळक विधान परिषदेचे सभापती होते. त्यानंतर टिळक कुटुंबामध्ये रोहित टिळक यांना काँग्रेसने पक्ष संघटनेत स्थान दिले, कसब्याची विधानसभेची उमेदवारी दिली. त्यानंतरही त्यांना पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार द्यावा वाटत असेल, तर शहर काँग्रेसकडून समर्थन केले जाणार नाही. याबाबत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे,' असा दावा स्थानिक नेत्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे केल्याची बातमी आहे. नक्की वाचा: लोकमान्य टिळकांचे 'हे' अनमोल विचार देतील तुमच्या जीवनाला योग्य दिशा.

दरम्यान 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. हे या पुरस्काराचे 41 वे वर्ष आहे.स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे रोहित टिळकांनी काल जाहीर केले आहे.