Loctust Attack in Maharashtra: अमरावती जिल्ह्यात टोळधाड दाखल; फळभाज्या व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Locust (Photo Credits: ANI)
Loctust Attack in Maharashtra: अमरावती जिल्ह्यात (Amravati District) टोळधाडीने (Locusts) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून आलेल्या टोळ धाडीने जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, मेळघाटातील शेतकऱ्यांच्या फळभाज्या व पालेभाज्यांची नासधूस केली आहे. ताशी 12 ते 16 किलोमीटरच्या वेगाने ही टोळधाड पुढे सरकत आहे. सध्या टोळधाडीने आपला मोर्चा मोर्शी तालुक्यातून वरूड तालुक्याकडे वळवला आहे. टोळधाडीच्या संकटामुळे विदर्भातील बळीराजा संकटात सापडला आहे.

 

सोमवारी सकाळी टोळधाड वरूड तालुक्यात आल्याने कृषी विभाग खडबडून जागा झाला. नाकतोडा गटातील हे कीटक शेकडो हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान करतात. या टोळधाडीमुळे संत्री, मोसंबी, भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ही टोळधाड पालेभाज्यांसह हिरव्या वृक्षांची पाने खातात. त्यामुळे पिकाचे नुकसान होते. (हेही वाचा - सातारा जिल्ह्यात 12 तासात 58 नवे कोरोना बाधित रुग्ण; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 394 वर पोहोचली)

अमरावती जिल्ह्याव्यतिरिक्त नागपूर, वर्धा जिल्ह्यातदेखील टोळधाड दाखल झाली आहे. पाणी आणि हिरवेगार पीक असल्याने या भागात हे किडे स्थिरावल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बेलोरा, अंतोरा आणि खांबी भागातही टोळधाड आली.

दरम्यान, मध्य प्रदेशातून वरूड, मोर्शी तालुक्यात आलेली टोळधाड शिंगोरी, पाळा, भिवकुंडी, सालबर्डी, घोडदेव, भाईपूरमध्ये दाखल झाली. टोळधाडीवर कृषी विभागाने फवारणी केल्यानंतर शेतात किड्यांचा सडा पडला होता. याशिवाय चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चुरणी, डोमा परिसरात रविवारी सायंकाळी 7 वाजता लाखोंच्या संख्येने टाळधोड दाखल झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी विभागाने टोळधाडीवर उपाय सांगितले आहेत. शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेताच्या आजुबाजुला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे, शेतामध्ये मशाली पेटवणे, टायर जाळुन धूर केल्यास टोळधाड नियंत्रण होते, असा सल्ला कृषीविभागाने दिला आहे.