सध्या कोरोना व्हायरससोबत देशावर टोळधाडीचे संकट आले आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या टोळधाडीने जवळजवळ उत्तर भारत काबीज करून आता महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अमरावती, गोंदिया येथील पिकांचे नुकसान करून ही टोळधड मुंबईच्या दिशेने सरकत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात आज मुंबईमध्ये टोळधाडीचा प्रवेश झाला आहे असे म्हणत इंक फोटो व व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले गेले होते. त्यानंतर यावर स्पष्टीकरण देत बीएमसीने (BMC) हे फोटो आणि व्हिडिओ मुंबईमधील नसल्याचे सांगितले आहे.
मुंबई महापालिकेच्या आपातकालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (LWO) गुरुवारी स्पष्टीकरण दिले की, टोळांची झुंड ही पूर्व महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असणार आहे, मुंबईकडे ते येऊ शकत नाहीत. टोळधाडीचे हे आक्रमण पूर्व महाराष्ट्राच्या काही भागात मर्यादित राहणार आहे व त्यामध्ये विदर्भातील जिल्हे बाधित होतील. मध्य प्रदेशातील वाऱ्याची दिशा ही टोळांची हालचाल फक्त त्याच भागात मर्यादित ठेवण्यास अनुकूल आहे. तसेच हा झोन त्यांच्या अन्न उपलब्धतेसाठी अनुकूल आहे. (हेही वाचा: मुंबई शहरातही टोळधाड दाखल? जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल)
मुंबईसह कोकण भागासाठी टोळधाडीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही, असे एलडब्ल्यूओचे उपसंचालक केएल गुर्जर यांनी सांगितले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी, राजन नारिन्ग्रेकर यांनी शहरातील कोणत्याही भागात टोळधाडीच्या प्रवेशाबाबत, राज्य किंवा केंद्रीय संस्थांकडून सतर्कतेची सूचना न मिळाल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे मुलमध्ये टोळधाड आल्याच्या बातम्या या खोट्या असल्याचे सिद्ध होत आहे.
Palghar district administration in Maharashtra issues advisory, asks farmers and officials to be prepared to tackle any possible locust infestation
— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातील विदर्भात टोळांचे आक्रमण पाहता राज्यातील पालघर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी, शेतकरी व अधिकाऱ्यांना पिकांवर होणार्या कोणत्याही हल्ल्याला सामोरे जाण्यास तयार होण्यास सांगितले. पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी अधिकृत संदेशात, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोळांच्या अतिक्रमापासून आपले उभे पीक वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले.