Locusts Seen in Mumbai?: मुंबई शहरातही टोळधाड दाखल? जुहू, विक्रोळीसह अनेक ठिकाणी टोळ दिसल्याचा दावा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Locusts in Mumbai (Photo Credits: Twitter)

2020 हे वर्ष भारताच्या इतिहासातील वाईट वर्षांपैकी एक म्हणून नोंदवले जाईल यात काही शंका नाही. एकीकडे देश कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत असताना आता अजून एक संकट आ वासून उभे आहे ते म्हणजे, टोळधाडीचे (Locust Attack). पाकिस्तानमधून आलेल्या या टोळधाडीने जवळजवळ उत्तर भारत काबीज करून आता महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. सध्या सोशल मिडियावर याच बाबत चर्चा सुरु आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा नंतर बुधवारी या टोळांच्या झुंडीने महाराष्ट्रात प्रवेश केला. आता, राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये (Mumbai) हे टोळ दाखल झाले असल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

मुंबई शहरात टोळ घुसले असल्याबाबत अजूनतरी अधिकृत पुष्टी झाली नाही, तरी ट्विटरवर लोकांनी या टोळधाडीचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यावरून अनेकांनी खरच मुंबईवर टोळधाडीचे आक्रमण झाले आहे का? असा प्रश्न विचारला आहे. यातील काही व्हिडिओ जुहू, विक्रोळी आणि कुलाबातील असल्याचे नमूद केले आहे. काल मध्यप्रदेशाच्या सीमेवरून आलेल्या टोळ धाडीने अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, मेळघाटातील शेतकऱ्यांच्या फळभाज्या व पालेभाज्यांची नासधूस केली. ताशी 12 ते 16 किलोमीटरच्या वेगाने ही टोळधाड पुढे सरकत आहे.

पहा मुंबईमध्ये टोळधाड आल्याचा दावा करणारे व्हिडिओ -

अमरावती जिल्ह्याव्यतिरिक्त नागपूर, वर्धा जिल्ह्यातदेखील टोळधाड दाखल झाली आहे. पाणी आणि हिरवेगार पीक असल्याने या भागात हे किडे स्थिरावल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(हेही वाचा: अमरावती जिल्ह्यात टोळधाड दाखल; फळभाज्या व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान)

एकाच व्हिडिओ शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचा असल्याचे सांगत शेअर केला आहे. ही ठिकाणेही एकमेकांपासून अतिशय दूर आहे, त्यामुळे हे खरे असण्याची शंका फार कमी आहे. दरम्यान, लोकांमधील घबराटीचे वातावरण कमी करण्यासाठी काही लोकांनी आपल्या परिसरातील मोकळ्या आकाशाचेही व्हिडिओ शेअर केले आहेत. अशा प्रकारे टोळ मुंबईमध्ये आले आहेत हे सांगणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, मात्र त्याबाबत अजूनतरी अधिकृत पुष्टी केली गेली नाही. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास न ठेवणे हे केव्हाही चांगले.