Lockdown in Maharashtra: महाराष्ट्रात संचारबंदी जाहीर होताच स्थलांतरीत कामगार पुन्हा गावी परतण्याच्या मार्गावर
Migrant Workers in Mumbai | (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात आज (14 एप्रिल) रात्री आठ वाजलेपासून संचारबंदी (Curfew) लागू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) संवादाच्या माध्यमातून काल (13 एप्रिल) ही माहिती दिली. ही कठोर निर्बंधांसह असलेली संचारबंदी म्हणजे एक प्रकारचा लॉकडाऊन (Lockdown In Maharashtra) असणार आहे. या लॉकडाऊनची धास्ती घेऊन मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार (Migrant Workers) पुन्हा आपल्या मूळ गावाकडे परतण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात ज्या त्रासातून जावे लागले तशाच प्रकारचा त्रास या वेळी होऊ नये यासाठी हे कामगार काळजी घेत आहेत. गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक व्यवस्था ठप्प असल्यामुळे शेकडो किलोमीटर पायपीट करत नागरिकांना मूळ गावी परतावे लागले.

मुंबई शहरातील सर्व रेल्वे स्टेशन्स. प्रामुख्याने सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, तसेच ठाण्यातील ठाणे, कल्याण आदी ठिकाणी परप्रांतीय आणि स्थलांतरीत मजुरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. हे मजूर आपल्या कुटुंबकबील्यासह गावाकडे जाण्यासाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. हे चित्र केवळ आजचेच नव्हे सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत मिळू लागल्यापासून हे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामळे रेल्वे फलाटांवर तिकीट खरेदी आणि फलाट तिकीट मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. अशा वेळी ही गर्दी पांगविण्यासाठी पोलीसांना कायद्याचा मार्ग अवलंबावा लागत आहे. काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. (हेही वाचा, मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्याकडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी 5 हजार 476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर)

दरम्यान, केवळ मुंबईच नव्हे तर पुण्यातही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट बस स्थानकातही अशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने नागरिक बस येण्याची वाट पाहात आहेत. यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि काही प्रमाणात तरुणांचाही समावेश आहे. लॉकडाऊन लागू झाल्यांनतर घरात बसून काय करायचे? त्या पेक्षा गावी जाऊन राहिलेले चांगले अशी भावना हे नागरिक व्यक्त करताना दिसतात.