CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

CM Uddhav Thackeray On Lockdown: लॉकडाऊन हवे की, जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. लॉकडाऊनमुळे जगाचेचं अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीनवशैलीतील बदल स्विकारावे लागतील. स्वचःची काळजी घेऊन कामांसाठी बाहेर पडावे लागेल, असं आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. आज उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना-ज्यांना महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते ते सर्व सहभागी होतील. माझ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते या मोहिमेत सहभागी होतील, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण तसेच आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल आणि लक्षणे असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे. जगभर आता कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी कामावर जाऊ लागली आहे. पण, त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेचं आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा -COVID-19 Vaccine Update: पुढच्या एका वर्षात कोरोना लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल)

ब्रिटेनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाचं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. याशिवाय माझे कुटंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हा मोहिमेचा गाभा आहे. त्यामुळे आपल्याला जनजागृती, ट्रेसिंग व टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे. डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे व रुग्णाला डॉक्टर सोबत औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे.

कोरोना होऊन गेल्यानंतरच्या उपचारातही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विभागाचा टास्कफोर्स तयार केला आहे. या टास्कफोर्सने निसंकोचपणे राज्यस्तरावरील टास्कफोर्सशी संपर्क साधावा. यातून राज्यातील मृत्यूदर कमी रहावा यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम देशातील नव्हे, जगातील आरोग्य चळवळ ठरेल, असा विश्वासदेखील यावेळी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. या मोहिमेमध्ये आपल्याला जनतेचा सहभाग वाढवायचा आहे. प्रत्येक कुटंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आपण घेणार आहोत. हातपाय धुणे, स्वच्छतेची काळजी घेणे, अशा सूचना ग्रामीण भाग व तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.