Maharashtra Assembly Elections 2019: लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. उदगीर, निलंगा, अहमदपूर, लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा अशी या मतदारसंघांची नावे आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हायवर एकेकाळी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड होती. मात्र, विलासराव देशमुख यांचे अकाली निधन. तसेच, लोकसभा निवडणूक 2014 नंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाला काहीशी ओघोहीट लागली. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये या जिल्ह्यात काँग्रेसला आपले प्रभुत्व कायम राखता आले नाही. दरम्यान, लोकसभा निडवणूक 2019 मध्येही देशभरात काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडत आहेत. त्यामुळे या निवडणूकीत लातूर जिल्हा राजकारणात काय घडते याबातब उत्सुकता आहे. पाहूयात लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय पक्षांची स्थिती, इतिहास आणि बरंच काही थोडक्यात.
उदगीर विधानसभा मतदारसंघ
उदगीर विधानसभा मतदारसंघ हा बहुधर्मीय मतदारांचा मतदारसंघ. तहीरी या मतदारसंघात आर्य समाज, हिंदू, मुस्लिम बहुल मतदारांचीही संख्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. या मतदारसंघात पक्षनिष्ठेपेक्षा जातीय समिकरणे अधिक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. सुरुवातीला हा मतदारसंघ खुला होता. पुढे हा मतदारसंघ राखीव झाला. हा मतदारसंघ राखीव होताच भाजपने या मतदारसंघावर आपले प्रभुत्व निर्माण केले. 2014 मध्ये या मतदारसंघातून भाजप उमेदवार निवडूण आला. भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव हे सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडूण आले आहेत. भाजपचे प्रचार तंत्र, नरेंद्र मोदी यांची छाप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आदी घटकांचा परिणीती भाजपच्या विजयात झाली. आता 2014 मध्येही चित्र वेगळे नसले तरी, या वेळी लढत रोमंचक होईल अशी स्थिती आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
सुधाकर भालेराव, भाजप – 66,686
संजय बनसोडे, राष्ट्रवादी – 41,792
रामकिशन सोनकांबळे, काँग्रेस – 37,837
रामचंद्र आदावळे, शिवसेना – 15,418
एम. आर. गायकवाड, अपक्ष – 1,958
निलंगा विधानसभा मतदारसंघ
निलंगा विधानभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेचा विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यानी एकेकाळी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे नातू भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील राजकीय लढाई हा तर राज्यभरातील राजकीय वर्तुळाती चर्चेचा विषय. एकेकाळी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि दिवंगत राजीव गांधी यांचे अत्यंत विश्वासू अशी शिवाजीरावांची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आजोबा विरुद्ध नातू असा थेट संघर्ष महाराष्ट्र अनुभवतो आहे. या वेळी हा संघर्ष कोणते टोक घेतोय याबातब उत्सुकता आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
संभाजीराव निलंगेकर-पाटील, भाजप – 76,817
अशोक निलंगेकर, काँग्रेस – 49,306
रेशमे विश्वनाथप्पा, मविआ – 17,675
बसवराज पाटील, राष्ट्रवादी – 16,149
अभय साळुंखे, मनसे – 16,015
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ
अहमदपूर हा राजकीय नेत्यांचा मतदारसंघ म्हणून जिल्हाभर ओळखला जातो. भाजपचे गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष दिलीपराव देशमुख, पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे, अॅड. भारतभाऊ चामे काँग्रेसचे डॉ. गणेश कदम, सिराज जहांगिरदार तर, राष्ट्रवादी कॉग्रेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार बाबासाहेब पाटील हे नेते या मतदारसंघात नेतृत्व करतात. विधानसभा निडणूक 2014 मध्ये विनायकराव जाधव-पाटील हे अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडूण आले. विनायकराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबासाहेब पाटील यांचा पराभव केला. या निवडणूकीत विनायकराव जाधव पाटील यांना 61,957 तर, बाबासाहेब पाटील यांना 57,951 मते मिळाली. विशेष म्हणजे गेले तीन टर्म या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारच निवडूण येत आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
विनायकराव जाधव-पाटील, अपक्ष – 61,957
बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी – 57,951
गणेश हाके, भाजप –53,919
विठ्ठल माकणे, काँग्रेस – 11,404
साजिद सय्यद, बसपा – 9,409
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ
लातूर शहर हा विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे तगडे नेते दिवंगत विलासराव देशमुख, केशवराव सोनावणे आणि शिवराज पाटील चाकूरकर अशा दिग्गजांनी या मतदारसंघातून नतृत्व केले आहे. सध्यास्थितीत काँग्रेसनेते व माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
अमित देशमुख, काँग्रेस – 1,19,656
शैलेश लाहोटी, भाजप – 70,191
मुर्तजखाँ पठाण, राष्ट्रवादी – 4,047
पप्पूभाई श्रीपाद कुलकर्णी – 2,323
रघुनाथ बनसोडे, बसपा – 2,202
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघावरही आजवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख तसेच, शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचा प्रभाव पाहायला मिळाल. आजही हा प्रभाव कायम आहे. माजरा नदी प्रदुषण, ऊसाची शेती, साखर कारखाणे, दुष्काळ, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य आदी विषय या मतदारसंघासाठी महत्त्वाचे ठरतात. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये काँग्रेस पक्षाच्या त्र्यंबकरावराव भिसे यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या रमेश कराड यांचा पराभव केला.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
त्र्यंबकराव भिसे, काँग्रेस – 1,00,897
रमेश कराड, भाजप – 90,387
हरिभाऊ साबडे, शिवसेना – 3,085
संतोष नागरगोजे, मनसे – 2,785
आशाबाई भिसे, राष्ट्रवादी – 2,672
औसा विधानसभा मतदारसंघ
औसा हा मतदारसंग राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, कृषी विशेष अशा सर्व मुद्द्यांवर वैशिष्ट्यपूर्णच राहिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावचे मूळ रहिवासी असलेले बसवराज पाटील हे काँग्रेस पक्षाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून औसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे भाजपने या वेळी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे औसा भाजपमध्ये तीव्र नाराजीही आहे. आता सामना कसा रंगतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
औसा विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
बसवराज पाटील, काँग्रेस – 64,237
दिनकर माने, शिवसेना – 55,379
पाशा पटेल, भाजप – 37,414
बालाजी गिरे, मनसे – 5,929
राजेश्वर बुके, राष्ट्रवादी – 4,946
दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.