Politics of Maharashtra: राजकीय नेत्यांचा शिवराळपणा आणि राजकारणात भाषेचा घसरलेला दर्जा
Political Leaders | | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सार्वजनिक जीवनात वावरताना बोलण्याच्या, व्यक्त होण्याच्या आणि वर्तनाच्या काही मर्यादा असतात. सर्वांनीच त्या पाळाव्यात हा नियम नाही पण, संकेत नक्कीच आहे. अपवाद वगळता तो सर्वजण पाळतातही. पण अलीकडे अपवादच इतके घडू लागले आहेत की, अपवाद हाच एक संकेत होती की काय? अशी शंका निर्माण व्हावी. महाराष्ट्रातील ( Politics of Maharashtra) सध्याची राजकीय स्थिती हेच दाखवते. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप करताना राजकीय नेत्यांनी भाषेची पातळी बेसुमार घसरवली आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना भाषेची पातळी घसरवणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे असेही नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके हे चार-दोन लोकच आहेत. पण, प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धीची चटक लागल्याने त्यांची जीभ प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसली की सुस्साट धावते. मग कोणी एखाद्या राजकीय नेत्याचा उल्लेख 'महाराष्ट्राचा कोरोना' म्हणून करतो. कोणी कोणाला 'टरबूज', 'चंपा', 'ग्रीसभाऊ' म्हणतो. तर कोणी एखाद्याचा उल्लेख थेट 'दलाल', 'भ*वा' असा करतो. यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडीस, माधवराव बागल, एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, अहिल्या रांगणेकर, एन.डी पाटील यांच्यासारखे एका पेक्षा एक अभ्यासू आणि फर्डे वक्ते असलेल्या नेत्यांची परंपरा महाराष्ट्राला आहे. असे असताना अलिकडील काळात ही परंपरा मोडीत निघताना दिसते आहे. (हेही वाचा, Kirit Somaiya on Sanjay Raut: 'भxx शब्दाचा अर्थ माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा' संजय राऊत यांच्यावर भडकले किरीट सोमय्या)

एक काळ होता. एखाद्या राजकीय नेत्याने आरोप केले तर त्याला पुरावा मागण्याची गरज नसे. त्या राजकीय नेत्याची प्रतिमाच अशी असायची की, या नेत्याने आरोप केला आहे म्हणजे तो खरा असणारच. त्याने केलेल्या आरोपांना पुरावा मागणे म्हणजे त्या व्यक्तीचा जणू अपमानच. वास्तवात असायचेही तसेच. राजकारणात एकमेकांचे विरोधक असले तरी राजकीय नेतृत्वांमध्ये परस्परांमध्ये जिव्हाळा असायचा. राजकीय फडात हे नेते एकमेकांवर तुटून पडत असत. पण, व्यक्तीगत जीवनात एकमेकांचा प्रचंड आदर करत. अलीकडे हा जिव्हाळाच हरवत चालला आहे. मुळात राजकीय नेतेच इतके बेजबाबदार झाले आहेत की, त्यांना प्रतिमाच उरली नाही. खरे तर अपवाद वगळता राजकीय नेता ही एक सभ्य भाषेतील 'शिवी' बनली आहे. पुर्वी गुन्हेगार लोक राजकीय मंडळींना टरकून असत. त्यामुळे ते राजकीय नेत्यांना धरुन असत. राजकीय नेतेही काही मर्यादीत फायद्यासाठी गुन्हेगारांशी हात राखून संबंध ठेवत. पण त्याचे प्रमाण प्रचंड कमी असे. अलिकडे थेट गुन्हेगारच राजकारणात येण्याचे आणि मातब्बर पक्षांकडून निवडणूक लढविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे.

राजकीय नेत्यांची सार्वजनिक जीवनात बोलताना. प्रामुख्याने पत्रकार परिषदा, जाहीर सभा आदि. जीभ वारंवार घसरते. ही जीभ घसरण्याचे कारण म्हणजे राजकीय नेत्यांचे कमी होत असलेले वाचन. पूर्वी अनेक राजकीय अभ्यासू असत. विविध विषयांवर त्यांची ठाम भूमिका असे. त्यांचा वाचनाचा आणि विषयांतील वकुबाचा व्यासंगही मोठा असे. अनेक नेत्यांची विविध विषयांवरील पुस्तकेही प्रचंड गाजली आहेत. आता अलिकडे तसे दिसत नाही. त्यामुळे बोलताना शब्द, शब्दांवरील उच्चार, त्याचे अर्थ याचे काहीच भान नेत्यांना दिसत नाही. अगदी रस्त्यावरील टपोरी दादाला शोभावी अशी भाषा ते वापरताना दिसतात. काही नेते तर चक्क शिवराळ भाषेसाठी प्रसिद्ध असतात. वरुन त्याला ती त्यांची स्टाईल आहे असेही त्यांचे समर्थक सांगताना दिसतात.

राजकीय नेत्यांच्या शिवराळपणाला आणि त्यांच्या घसरत असलेल्या नैतिकतेला चाप लावण्याची जबादारी समाज म्हणून सर्वसामान्य नागरिकावरच आहे. आपण मानतो तो किंवा कोणताही नेता सार्वजनिक जीवनात जे बोलतो त्याला आपण व्यक्तीगत पातळीवर तरी सहमत असतो का? हा प्रश्न आपण सर्वांनीच स्वत:ला विचारायला हवा. जर त्या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर विषयच संपतो. पण जर त्याचे उत्तर नाही असे असेल तर आपण अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवू शकतो. त्यासाठी आपण नागरिक म्हणून आपल्या स्वत:शी प्रामाणिक राहण्याची गरज आहे इतकेच.