![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/12/ladki-bahin-yojana.jpg?width=380&height=214)
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यभरातील अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. जरी ती राज्याच्या तिजोरीवर मोठा भार टाकत असली तरी. आता तर चर्चा आहे की, दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये वाढ करुन ते 2100 रुपये होणार Ladki Bahin Yojana Fund) असल्याची. अर्थात विधानसभा निडवणूक 2024 मध्ये केल्या जाणाऱ्या प्रचारापासून हीच चर्चा आहे. राज्य सरकारनेही अनेकदा त्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. प्रत्यक्षात मात्र अजून तरी ती वाढ झाली नाही. असे असले तरी, पुढच्या काहीच दिवसांमध्ये त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने त्यासाठी तारीख आणि मुहूर्तही ठरवल्याचे समजते?
लाभाची रक्कम वाढणार?
राज्यविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यापासून सुरु होत आहे. विद्यमान वर्षातील मार्च महिन्यातील पहिल्याचदिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. याच अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम 1500 रुपयांवरुन ती पुढे 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे घले तर, मूळ लाभामध्ये 600 रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण तुपाशी, बाकीच्या योजना उपाशी; सरकारी भाऊ देणार का लाभ?)
महिला व बालविकास विभागाचे कानवर हात
राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा होईल असे तर्क लावला जात असला तरी, प्रत्यक्षात ही योजना ज्या विभागामार्फत राबवली जात आहे त्या विभागाने मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत. राज्याच्या महिला व बालविकास विभागाद्वारे ही योजना राबवली जाते. या विभागाकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, अद्याप तरी आपल्या विभागाकडून राज्याच्या अर्थमंत्रालयाकडे लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम 1500 रुपयांहून 2100 रुपये इतकी करावी अशी मागणी, अथवा कोणताही प्रस्तावर पाठविण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांवर कारवाई, मुंबईत नेमके काय घडले नेमके? घ्या जाणून)
एका बाजूला लाभाची रक्कम वाढणार असल्याची चर्चा असतानाच दुसऱ्या बाजूला आलेल्या अर्जांची छाननी केली जात आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांचे अर्ज पुन्हा एकदा तपासले जात आहेत. त्यातील निकषात न बसणाऱ्या अर्जांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. शिवाय, एकपेक्षा अनेक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही वगळण्यात आल्याचे समजते.
कुटुंबामध्ये चारचाकी वाहन, आयकर परतावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असेल किंवा लाभार्थ्याने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असेल, तर अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येत आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळल्यानंतर नेमक्या किती महिला लाभार्थी म्हणून उरणार आणि कोणाकोणाला लाभ मिळणार याबाब उत्सुकता आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे आठ हप्ते देण्यात आले आहेत. आता प्रतिक्षा आहे ती नवव्या हप्त्याची. या वेळच्या हप्त्यामध्ये निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे हप्ता वाढणार की नाही यापेक्षा अनेक महिलांमध्ये आपण योजनेत राहतो की नाही याचीच अधिक भीती पाहायला मिळत आहे.