Ladki Bahin Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), राज्यभरातील महिलांना सुरुवातीला खूपच छान वाटली. राज्यभरातील महिलांनी योजनेस जोरदार पाठींबा दिला. तत्कालीन राज्य सरकारला याचा राजकीय फायदाही झाला. ज्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) झाले. दरम्यान, आता 'कहाणी में ट्विटस आ गया है'. सरसकट लाभाच्या धनी झालेल्या अनेक महिलांवर राज्य सरकार थेट कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. ज्याचा सर्वाधिक फटका मुंबई शहरातील लाडक्या बहिणींना बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकारने निकषांमध्ये (Ladki Bahin Yojana Criteria) न बसणाऱ्या जवळपास 22 हजार महिलांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळले आहे. या योजनेंतर्गत केली गेलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

मुंबईमध्ये लाडक्या बहिणींना धक्का

लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून राज्य सरकारने निकषांचा कोणताही विचार न करता अर्ज केलेल्या आणि वयोगटात बसणाऱ्या महिलांना सरसकट लाभ दिला. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या काही कोटींच्या घरात गेली. ज्यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार आला. इतका की, राज्य सरकारला ही योजना सुरु ठेवताना नाकी नऊ येऊ लागले. असेही वृत्त आहे की, सरकारला या योजनेसाठी निधीची पुर्तता करताना इतर विभागांच्या निधीला कात्री लावावी लागत आहे. राज्यातील इतर योजना रखडल्या असून, त्या योजनांचे लाभार्थी लाभाची वाट पाहात आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दरम्यान, साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने या योजनेसाठी मुंबईतून आलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी सुरु केली. या छाननीमध्ये निकषांचे उल्लंघन करुन लाभ मिळवलेल्या 22 हजार महिलांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांना पुढच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती चांगली? सांगण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर; सरकारचा केवळ प्रसिद्धीसाठी निर्णय)

आगोदरच मालामाल तरीही योजनेसाठी गोलमाल

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली असता पुढे आले की, अनेक महिलांके चरचाकी वाहन आहे. काही महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहेत. अनेक महिलांनी स्वत:चा आयकर परतावाही दाखवला आहे. त्यातील काही महिला स्वत: नोकरी, व्यवसाय करत असन त्यांचे वार्षीक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे. असे असतानाही त्यांनी योजनेचा लाभ मिळवला आहे, अशा महिलांची संख्या मोठी असल्याने राज्य सरकारने कारवाईची मोहीमच हाती घेतली असून, त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना', सरकारविरोधात सामान्य जनतेमध्ये संताप)

लाडकी बहीण योजना निकष

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या घरातील कोणताही सदस्य लाडकी बहीण योजना लाभार्थी असेल किंवा लाभ मिळवू इच्छित असेल, तर त्याने खालील निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. निकषांची पूर्तता झाली नाही तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा फेटाळला जाऊ शकतो. हे निकष खालील प्रमाणे:

  • अर्जदार/लाभार्थी महिला 18 वर्षे पूर्ण आणि 65 वर्षांखालील वयोगटातील असावी.
  • अर्जदार/लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त अडिच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
  • कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी सेवेत, नोकरीत, लाभावर नसावा. तो प्राप्तिकर भरणारा नसावा.
  • अर्जदार/लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे. अपवाद केवळ ट्रॅक्टर.
  • अर्जदार/लाभार्थी महिलेने संजय गांधी निराधार योजना अथवा तत्सम सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, पात्र महिलांना प्रतिमहिना मिळणार 2100 रुपये; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती)

दरम्यान, राज्य सरकारने केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील इतरही सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना अर्जदारांची पडताळणी सुरु केली आहे. ज्यामध्ये जिल्हाधिकारी पातळीवर लाभार्थ्यांची यादी वर्गीकृत करुन त्यांची छाननीही सुरु आहे. या कामासाठी , बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांच्या घरी जाऊन चौकशी आणि पाहणी करत आहेत. ज्यामुळे लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती मिळू लागली आहे. तसेच, अनेक लाभार्थ्यांनी निकषांचे उल्लंघन केल्याचेही आढळून येत आहे. या सर्व महिलांची नावे योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ लागली आहेत.