लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आता केवळ महिलाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही संतापाचा विषय ठरत आहे. या योजनेबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चा आणि त्यावर राज्य सरकारकडून दिली जाणांरी संभ्रमीत उत्तरे, हे या संतापाचे कारण आहे. कधी ही योजना बंद होणार, तर कधी योजनेद्वारे लाभ म्हणून महिलांना दिलेले पैसे परत वसूल केले जाणार, अशी चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारमधील मंत्री तर स्वत:च सांगत आहेत की, निकषांचा विचार (Ladki Bahin Yojana Eligibility) केला जाईल आणि त्यानंतर निकषाबाहेरील अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. दरम्यान, निकषपात्र नसलेल्या महिलांनी स्वत:च आपले अर्ज मागे घ्यावेत, असेही हे मंत्री सांगत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे.
रद्दच कराचे होते तर अर्ज मंजूरच का केले?
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू केली. त्या वेळी योजनेबाबत विविध निकष असले तरी ते लावण्यात आले नाहीत. सरकारने महिलांचे सरसकट अर्ज भरुन घेतले आणि ते मंजूरही केले. ज्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला. इतका की, निधीसाठी सरकारला इतरही विभागांच्या निधी आणि खर्चांना कात्री लावावी लागल्याचे वृत्त आहे. परिणामी सरकार आता योजनेमध्ये अधिक सूसूत्रता आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना वगळण्याचा विचार सरकारदरबारी सुरु आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये आपला अर्ज बाद होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी जर निकषात बसतच नव्हेत तर सरकारने आगोदर अर्ज मंजूरच का केले? असा संतप्त सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, पात्र महिलांना प्रतिमहिना मिळणार 2100 रुपये; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती)
आदिती तटकरे यांच्याकडून सारवासारव
दरम्यान, अपात्र अर्जांवर कारवाई करण्याचा राज्य सरकारचा विचार असला तरी, महिलांना दिलेले पैसै परत घेण्याबाबत मात्र राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचे दिसते. स्वत: महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, लाडकी बहीण योजना सुरुच राहणार आहे. मात्र, त्याबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. अनेक महिलांनी निकषात बसत नसले तरीही योजनेचा लाभ घेतला आहे. अशा महिलांना आता स्वत:हूनच आमचा अर्ज मागे घेत आहोत. आम्हाला योजनेचा लाभ नको, असे सांगत आहेत. त्यांनी तसा अर्ज स्वत:हून केला आहे, असेही तटकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, योजनेबाबत सुरु असलेला संभ्रम अद्यापही कायम आहेच.