Nitesh Rane | Photo Credits: Twitter)

देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला असून मुंबईत ठाकरे सरकारचा भलताच 'मुंबई पॅटर्न' (Mumbai Pattern) पाहायला मिळत आहे. ठाकरे सरकराचा मुंबई पॅटर्न (Mumbai Pattern) हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. यासंदर्भातील एक ट्विट नितेश राणे यांनी केला आहे. मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांनी मंगळवारी ट्विट करुन यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश यांनी म्हटले.हेदेखील वाचा- जालन्यात आता लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांची होणार अँटिजेन टेस्ट; राजेश टोपेंचे आदेश

कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो, असे नितेश राणे यांनी सांगितले. आता नितेश राणे यांच्या आरोपाला शिवसेना आणि महाविकासआघाडीचे इतर नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

मुंबईत काल ३ हजार ३७५ कोरोनाबाधित बरे झाले, २ हजार ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७८ हजार ४७५ झाली आहे. यापैकी ६ लाख १३ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १३ हजार ८१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईचा कोरोनामुक्ती दर ९१ टक्क्यावर स्थीर आहे. सध्या मुंबईत ४७ हजार ४१६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.दरम्यान मुंबईतला कोरोना दुपटीचा कालावधी दीडशे दिवसांपेक्षा जास्त होऊन १५३ दिवसांवर पोचला असल्याचं मुंबई महापालिकेच्या आरोग्य प्रशासनानं कळवले आहे.