महाराष्ट्रात कालपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. असे असले तरीही ही परिस्थिती म्हणावी तशी आटोक्यात आली नसल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान जालन्यात कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता आता कोरोना लस घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांची देखील अँटीजेन चाचणी घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे. काल (10 मे) जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या सहवासितांचा अचूकपणे शोध घेण्यात यावा. डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबत असल्याचे निर्दशनास येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात फैलावू शकत असल्याने कुठल्याही ठिकाणी बाधित रुग्णासोबत नातेवाईक थांबणार नाहीत, याची दक्षता घ्या, असे आदेश टोपे यांनी दिले.हेदेखील वाचा- Coronavirus: मुंबईकरांसाठी Corona Vaccine जागतिक पातळीवरुन खरेदीसाठी BMC कडून विचार सुरु- आदित्य ठाकरे
प्रत्येक कोविड हेल्थ सेंटर, कोव्हीड केअर सेंटरवर पोलीस प्रशासनामार्फत पोलीसांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी सातत्याने या सेंटरला भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अनेक लोक ताप, सर्दी, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानासुद्धा दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत व रुग्णांची प्रकृती खालावून अनेकप्रसंगी रुग्णांचा मृत्यूही होतो. त्यामुळे बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणून घेऊन त्यांना उपचाराच्यासंदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करा. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरणाच्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असलेल्या नागरिकांची अँटीजेन तपासणी करण्यात यावी. जेणेकरुन नागरिक बाधित असल्यास त्याच्यापासून दुसऱ्याला होणारा संसर्ग रोखण्यास मदत होण्याबरोबरच लसही वाया जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.