भाजप फारच नंतर आला, शिवसेना नेतृत्वाने या आधीही अनेक पक्षांशी केली आहे युती, हा पाहा इतिहास
History of Shiv Sena party alliance | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

Shiv Sena Alliance History in Maharashtra And BMC Election: शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्या युतीचे समिकरण गेल्या काही वर्षांत बरेच घट्ट झाले. विधानसभा निवडणूक 2014 चा अपवाद वगळता या युतीला जवळपास 75 वर्षे झाली. पण, विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Legislative Assembly election, 2019) मध्ये शिसेनेने भाजपसोबतची युती पहिल्यांदाच तोडली (अधिकृत जाहीर न करता) आणि शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षासोबत 'हिच ती योग्य वेळ' असे म्हणत घड्याळाने दाखवल्या काळाची पावले ओळखून काँग्रेस (Congress) पक्षाचा हात हातात घेतला. शिवसेना असे कसे वागली? आता त्यांच्या कडवे हिंदुत्त्व, मराठी माणूस, समान नागरी कार्यक्रम, राम मंदिर आदी आक्रमक मुद्द्यांचे काय होणार असा सवाल अनेकांना पडला. शिवसेनेने दिलेला दणका त्याच्या मित्रपक्षाच्या इतका जिव्हारी लागला की, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस ((Sena-NCP-Congress Alliance) ही एक अभद्र युती तयार झाल्याचेही भाजप (BJP) जाहीर बोलू लागला. पण, मंडळी शिवसेना पक्षासोबत युतीच्या खेळात भाजप फारच नंतर आला आहे. या पक्षाने पक्षाने या आधीही अनेक पक्षांशी केली आहे युती, हा पाहा इतिहास.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे या अत्यंत दृष्ट्या आणि कडव्या समाजसुधारक आणि लेखक, पत्रकाराच्या मुलाने म्हणजेच व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 या दिवशी शिव सेना नावाची संघटना स्थापन केली. महत्त्वाचे म्हणजे त्या वेळी शिवसेना हिंदूत्तत्ववादी नव्हती. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे तेव्हा या संघटनेचे सूत्र होते. पण, अल्पावधीतच या संघटनेने थेट राजकारण प्रवेश करायचे ठरवले आणि ही संघटना राजकीय पक्ष म्हणून आकार घेऊ लागली. 1966 शिवसेना स्थापन झाली आणि पुढे अवघ्या दोनच वर्षांनी म्हणजे 1968 मध्ये लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सक्रिय सहभाग घेतला. मराठी माणूस आणि मराठी या प्रादेशिक अस्मितेच्या जोरावर या निवडणुकीत शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत 42 जागा स्वबळावर जिंकल्या. त्या वेळी 140 सदस्य संख्या असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेना 42 जागा निवडूण आल्याने प्रमख विरोधी पक्ष ठरला.

शिवसेना-प्रजा समाजवादी पक्ष युती (1968)

मुंबई महापालिका निवडणूक 1968 मध्ये शिवसेना 42 जागांवर निवडूण आला. पण, त्या वेळी शिवसेनेने प्रजा समाजवादी या पक्षासोबत युती केली होती. ही युती केवळ दोनच वर्षे टिकली. काही मुद्द्यांव सहमत होऊ न शकल्याने शिवसेना पक्षाची पहिली युती तुटली.

शिवसेना-रिपब्लिकन पक्ष युती (रा.सु. गवई गट) (1972)

प्रजा समाजवादी पक्षासोबत युती तुटली. त्यानंतर शिवसेना पक्षाने रिपब्लिकन पक्ष (रा.सु. गवई गट) सोबत युती केली. विशेष म्हणजे शिवसेनेने त्या वेळी केवळ रिपब्लिकन पक्षच नव्हे तर, चक्क मुस्लिम लीग या पक्षासोबतही युती केली होती. पण, ही युती सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीपूरतीच मर्यादित होती. (हेरी वाचा, शरद पवार यांचा 'पॉवर गेम'; महाराष्ट्रात अनेकांच्या दांड्या गुल, भलेभले चितपट, पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक राजकारणाला लगाम)

शिवसेना-राष्ट्रीय काँग्रेस युती (1974)

मुंबई महापालिकेत 1974 मध्ये शिवसेना पक्षाचा महापौर होता. पण, अल्पमतात असल्याने आणि संख्याबळाचे गणीत जमविण्यासाठी शिवेसनेने काँग्रेस पक्षासोबतही युती केली होती. ही युती 1976 ते 1978 अशी तीन वर्षे टिकली.

शिवसेना-दलित पँथर युती (1980)

1980 च्या दशकात रामदास आठवले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांच्यासह अनेक आक्रमक अशा दलित नेत्यांनी दलीत पँथर ही चळवळ सुरु केली होती. त्या काळात शिवसेनेला आव्हान देणारी आणि तितकीच लोकप्रिय असलेली अशी ही संघटना होती. सत्तेसाठी शिवसेनेने दलित पँथर सोबतही युती केली. पण, काळाच्या ओघात रिपब्लिकन पक्षाप्रमाणेच दलित पँथरही फुटली. तसेच, शिवसेनोसबोत पँथरची युतीही तुटली.

शिवसेना: एकला चलो रे

दरम्यानच्या काळात शिवसेनेने सर्व पक्षांसोबतची युती तोडत एकला चलो रे चा नारा दिला आणि शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज झाली. त्या काळात हिंदुत्त्ववादी संघटना नुकत्याच आक्रमक बाळसे धरु लागल्या होत्या. लालकृष्ण आडवाणी यांच्या सोमनाथ ते आयोध्या अशा रथयात्रेची पार्श्वभूमी तयार होण्याचा तो काळ होता. या काळात शिवसेनेलाही हिंदुत्त्वाचे वारे नगळत लागत होते. पण, शिवसेना पूर्ण हिंदुत्त्ववादी झाली नव्हती. 1980 ते 1989 या नऊ ते दहा वर्षांच्या काळात शिवसेना स्वबळावरच निवडणुका लढत होती.

शिवसेना, हिंदूत्व आणि भाजपसोबत युती

दरम्यान, 1989 च्या आसपास शिवसेनेने हिंदूत्व हा मुद्दा जवळपास अधिकृतपणे स्वीकारला. त्यात भाजप नेते दिवंगत प्रमोद महाजन यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप युती झाली. हे वर्ष 1990 होते असे युतीचे अभ्यासक सांगतात. दरम्यान, 1990 मध्ये झालेली शिवसेना-भाजप युती ही पुढे 25 वर्षे टीकली. पण, पुढे वयपरत्वे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन (17 नोव्हेंबर 2012) झाले. काळाच्या ओघात भाजपनेही महाराष्ट्रात हातपाय पसरले. आणि अखेर तो क्षण आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधी लाट देशभरात तयार झाली. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. भाजपने विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सोईस्करपणे शिवसेना पक्षासोबतची युती तोडली. पुढे निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाहेरुन पाठिंब्यावर भाजप सत्तेतही आली. पण, आवश्य संख्याबळाचा विचार करता भाजपने शिवसेनेला सत्तेत सामावून घेतले. तसेच, शिवसेनाही फारशी खळखळ न करता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली. हे सरकार 2014 ते 2019 अशी पाच वर्षे चालले.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस युती/आघाडी (2019)

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीद्वारे लढले. ही निवडणूक भाजप अतिआत्मविश्वासाने लढला. भाजपला स्वबळवर सत्ता येईल अशी आशा होती. मात्र, भाजपची गाडी 105 वरच अडकली. तर, शिवसेना 56 जागांवर विजयी झाली. त्यामुळे सत्तास्थापन करायची तर भाजपला शिवसेनेची गरज भासत होती. दरम्यान, सत्तेचे समसमान वाटप आणि मुख्यमंत्री पद यावर शिवसेना ठाम राहिली. भाजप नेतृत्वाने युतीची बोलणी करतानाच शिवसेना नेतृत्वास मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समसमान वाटप असा शब्द दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे अनेक वेळा जाहीर सांगितले आहे. पण, पुढे आक्रमक राजकारण करत आपण असा काही शब्दच दिला नव्हता अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी घेतली. त्यामुळे इथेच शिवसेना-भाजप फिस्कटले आणि युती जवळपास तुटली. या पार्श्वभूमिवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी नवी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वात येऊन सत्ता स्थापन करताना दिसत आहे.

वरील सर्व विवेचन ध्यानात घेता शिवसेनेसोबत युतीच्या खेळात भाजप फारच उशीरा आला आहे. शिवसेनेने अनेक वेळा अनेक पक्षांसोबत युती केली आहे. त्या वेळी शिवसेनेची भूमिकाही काहीशी लवचीक राहिली आहे. त्यामुळे आता शिवसेना जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्षांसोबत युती करत असेल तर त्यात फारसे वावगे वाटावे असे काही नाही. अर्थात, एक गोष्ट जरुर ध्यानात घ्यावी लागेल ती म्हणजे शिवसेना भाजप ही युती प्रदीर्घ काळ टीकली. भारतातही युती आणि आघाडीच्या राजकारणात हे उदाहरण दुर्मिळ आणि उल्लेखनीय आहे. पण, असे असले तरी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस ही युती अभद्र आहे, असे म्हणने काहीसे अन्यायकारक ठरु शकते.