हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: हिंगोली, कळमनुरी आणि वसमत जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
हिंगोली जिल्हा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

Maharashtra Assembly Elections 2019: 1999 मध्ये परभणीपासून हिंगोली वेगळा झाला व तिथे 5 तालुक्यांत मिळून 3 विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले. हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे ते मतदारसंघ होय. 288 आमदारांपैकी एकट्या मराठवाड्यातून 46 आमदार निवडून येतात, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची नजर मराठवाड्यावर असते. 2014 पर्यंत हिंगोली हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड होता मात्र त्यानंतर इथे कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना अशा तीनही पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेमध्ये शिवसेनेने इथे दणदणीत विजय मिळवला आहे. आता या विधानसभेसाठी इथल्या तीनही जागांसाठी एकूण 33 उमेदवार रिंगणात उभे आहेत. चला पाहूया हिंगोली जिल्ह्यातील मतदारसंघ आणि महत्वाच्या लढती

हिंगोली (Hingoli) - या मतदारसंघात 1962 साली साली पहिल्यांदा काँग्रेसचे नारायणराव लिंबाजीराव यांनी विजय मिळवला. त्यानंतर इथे अनेकवेळा आलटून पालटून कॉंग्रेसची सत्ता राहिली आहे. पुढे 1999 ते 2014 या काळापर्यंत काँग्रेसच्या भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सतत विजयश्री प्राप्त केली आहे. मात्र मागच्या विधानसभेला भाजपच्या तानाजी मुटकुळे यांनी त्यांचा पराभव करून इथला आमदार होण्याचा मान मिळवला.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

1) तानाजी मुटकुळे, भाजप – 97, 045

2) भाऊराव पाटील, काँग्रेस – 40, 599

3) दिलीप चव्हाण, राष्ट्रवादी – 21, 897

यंदाच्या विधानसभेसाठी भाजपकडून तानाजी मुटकुळे तर कॉंग्रेसकडून भाऊराव पाटील एकमेकांसमोर उभे आहेत.

कळमनुरी (Kalamnuri) - हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. इथे मुस्लिम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजाचे लोक जास्त आहेत त्यांच्याच मतांवर इथले राजकारण फिरत असते. मुस्लीम मतदारांच्या जोरावर कॉंग्रेसने 4 वेळा, तर आदिवासी लोकांच्या मतांवर माकपचे विठ्ठल नाईक यांनी 4 वेळा विजय मिळवला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि शिवसेना इथे आपला जोर लावू पाहत असल्याचे दिसत आहे. सध्या कॉंग्रेसचे संतोष टारफे हे इथले विद्यमान आमदार आहेत.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

1) डॉ. संतोष टारफे, काँग्रेस – 67, 104

2) गजानन घुगे, शिवसेना – 56, 568

3) अॅड. शिवाजी माने, राष्ट्रवादी – 38, 085

यंदा पुन्हा एकदा कॉंग्रेसने संतोष टारफे यांना रिंगणात उतरवले आहे, तर शिवसेनेकडून संतोष बांगर त्यांना टक्कर देणार आहेत.

वसमत (Vasmat) - हिंगोली जिल्ह्यातील वसमत हा मतदारसंघ मुख्यत्वे शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांची मर्जी, सोयी सुविधा पहिल्या तर ही मते आपलीच म्हणून समजा. एकेकाळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र 2004 आणि 2009 साली राष्ट्रवादीने आपला झेंडा इथे फडकवला. मात्र त्यानंतर 2014 साली पुन्हा एकदा शिवसेनेन इथे विजय प्राप्त केला. जयप्रकाश मुंदडा हे इथले विद्यमान आमदार आहेत.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

1) जयप्रकाश मुंदडा, शिवसेना – 63, 851

2) जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादी – 58, 295

3) अॅड. शिवाजीराव जाधव, भाजप – 51, 197

4) अब्दुल हाफिज अब्दुल रेहमान, काँग्रेस – 13, 325

यंदा इथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. जयप्रकाश मुंदडा (शिवसेना), चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी) तर वंचित कडून शेख पटेल निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.