राज्यात कोविड-19 लसीच्या तुटवड्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे दर आठवड्याला किमान 40 लाख कोविड-19 लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांची केंद्राकडे केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, लसीचा साठा, पुरवठा, लसीकरण यासंदर्भात भाष्य केले. तसंच महाराष्ट्र कोविड-19 संकटात हलगर्जीपणा करत असल्याच्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harshvardhan) यांनी केलेल्या आरोपांना देखील चोख उत्तर दिले आहे.
कोविड-19 लसींसंदर्भात केंद्राकडून प्रमाणापेक्षा कमी मदत मिळत असून सध्या केवळ 7.5 लाख लसी पुरवण्यात येणार आहेत. मात्र, मध्य प्रदेशमध्ये 40 लाख, उत्तरप्रदेश मध्ये 48 लाख, गुजरात 30 लाख आणि हरियाणा 24 लाख असे लसीकरणाचे वाटप झालेले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संवाद साधला असता यावर लवकरात लवकर पाऊलं उचलू असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
लसीची वितरण व्यवस्था व्यवस्थित का नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. देशातील सर्वाधिक रुग्ण ज्या राज्यात आढळून येतात, त्या राज्यात केवळ 7.5 लाख लसी आणि बाकी राज्यांना 40 लाख लसी का? असेही त्यांनी म्हटले. (पुण्यात 109 लसीकरण केंद्र बंद; लसींचा पुरवठा करण्याची सुप्रिया सुळे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विनंती)
महाराष्ट्रात दिवसाला 6 लाख लोकांना लस दिली जात आहे. हा रेट पाहता महिन्याला 1 कोटी लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे. लसींच्या तुटवड्यामुळे कित्येक जिल्ह्यांमधील लसीकरण आता ठप्प झाले आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लस न घेता नागरिकांना परतावे लागत आहे, ही बाब डॉ. हर्षवर्धन यांच्या निर्दशनास आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसंच मध्यम वर्ग अधिक फिरतीवर असल्याने त्यांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरण करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान, आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी उत्पादक कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितले. रेमडेसिवीरचं राज्यात उत्पादन होत नाही. त्यामुळे शरद पवार रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी लवकरात लवकर रेमडेसिवीर उपलब्ध होईल, अशी आशा आहे. सध्या केंद्राच्या 30 टीम्स राज्यातील 30 जिल्ह्यात तपासणी करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. त्यामुळे प्रत्येक राज्यात ऑक्सिजनचा 'बफर स्टॉक' हवा, असल्याचेही त्यांनी म्हटले. सध्याच्या परिस्थितीत वाद न करता केंद्र आणि राज्याने हातात हात घेऊन काम करायला हवं, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.