पुण्यात 109 लसीकरण केंद्र बंद; लसींचा पुरवठा करण्याची सुप्रिया सुळे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विनंती
Supriya Sule (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यातच लसीचा तुडवडा निर्माण झाला आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील ट्विट करत लसींचा पुरवठा करण्याची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harshvardhan) यांच्याकडे केली आहे. तसंच लसीच्या अभावामुळे लसीकरण बंद झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "पुणे जिल्ह्यात आज 55,539 जणांचे लसीकरण झाले. लसींचा साठा कमी असल्याने हजारो लोक आज लस न घेताच परत गेले. 109 लसीकरण केंद्र लसींचा साठा नसल्याने बंद पडली आहेत. लसींच्या साठ्याच्या अभावामुळे लसीकरणाचा वेग मंदावला जाईल. जीव वाचविण्यासाठी, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी प्रत्येकाला लस देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आम्हाला कोविड-19 लसीचा पुरवठा करावा."

सुप्रिया सुळे ट्विट्स:

काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात केवळ 14 लाख लसी शिल्लक असल्याने वेळेत लसींचा पुरवठा न झाल्यास लसीकरण बंद होईल, असे म्हटले होते. यावर देशात लसींची कमतरता नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. तसंच महाराष्ट्राने कोविड संकटाचा सामना करताना हलगर्जीपणा केल्याचा म्हणत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. (कोरोना लसीवरुन केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विरोधाभासात्मक विधाने)

दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून बेड्स अपुरे पडण्याची भीती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. तसंच बेड्स आणि व्हेंटीलेटर्स उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे.