महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातही कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. हा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करणे गरजेचे आहे. त्यासाठी देशभरातून केंद्र सरकारकडे मागणी होत आहे. रुग्णसंख्या पाहता ही मागणी महाराष्ट्रातून अधिक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यंत्री डॉ. हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही असे म्हटले आहे. हर्षवर्धन यांच्या विधनातील विरोधाभास महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या विधानातून पुढे आला आहे. राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोना लसीचे केवळ 14 लाख डोसच शिल्लख आहेत. केंद्र सरकारने लसीचे पुढील डोस वेळेत पाठवले नाहीत तर राज्यातील लसीकरण बंद पडण्याची भीतीही टोपे यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील आरोग्यमंत्र्यांची विधाने पाहिली असता सर्वसामान्य नागरिक संभ्रमात पडण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला राज्यात कोरोना व्हायरस संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. हा संसर्ग वाढत असताना राज्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लस पूरवठा व्हावा अशी मागणी होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने घरोघरी जाऊन कोरोना लस देण्याचा तसेच, 25 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवला होता. हा प्रस्तावही पुढे सरकला नसल्याचे पाहायला मिळत आहे. (सविस्तर वाचा, महाराष्ट्रात केवळ 14 लाख लसी शिल्लक, वेळेत लसींचा पुरवठा न वाढल्यास लसीकरण बंद पडण्याची भीती - आरोग्यमंत्री राजेश टोपे)
काय म्हणाले राजेश टोपे?
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राने कोरोना लसीचे प्रती आठवडा 40 लाख डोस मिळावे अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्यास अवघ्या काही दिवसांतच लसीकरण बंद पडण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि देशातील 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत हर्षवर्धन यांची बैठक मंगळवारी (6 एप्रिल) पार पडली. या वेळी ही मागणी करण्यात आल्याचे टोपे म्हणाले. ते मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी टोपे यांनी सांगितले की, राज्यात आगोदर ते 3 लाख इतकेच दिले जात होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सूचवले की राज्यात प्रतीदिन 6 लाख डोस द्या. त्यामुळे लसीकरणाची गती आणि क्षमता वाढवली. सद्या प्रतीदिन 4.5 लाख डोस दिले जात आहेत. लवकरच 6 लाख डोस प्रतिदिन इतके लक्ष्य गाठले जाईल. परंतू, 4.5 लाख प्रतिदिन या वेगातच तुठवडा जाणवू लागल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, देशात कोरोना लस पुरेशा प्रमाणात आहे. कोणत्याही प्रकारे लसीचा तुटवडा नाही. देशातील कोरोना स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. असे असले तरी आपल्यात अनेक त्रुटी आहेत. नियमांचे उल्लंघन करणे. बेजबाबदार वर्तन करणे अशा गोष्टी कोरोना प्रसारास कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे. देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असले तरी त्यांचा रिकव्हरी दरही वाढला आहे. देशातील रिकव्हरी दर सध्या 92.38% इतका आहे. तर मृत्यू दर 1.30% इतका असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.