महाराष्ट्रात केवळ 14 लाख लसी शिल्लक, वेळेत लसींचा पुरवठा न वाढल्यास लसीकरण बंद पडण्याची भीती  - आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात सातत्याने 50 हजारांच्या वर कोरोना रूग्ण आढळत असल्याने आता प्रशासन अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे. आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासोबत लसीकरणाला वेगवान करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लवकरच राज्यात प्रतिदिन 6 लाख डोस देण्याचं उद्दिष्ट गाठणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यात आठवड्याला केंद्राने किमान 40 लाख लसींचे डोस पुरवावेत अशी महत्त्वाची मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रात केवळ 14 लाख डोस उपलब्ध आहेत. राज्याचा वेग पाहता हा केवळ 3 दिवसांचा पुरवठा आहे. त्यामुळे तात्काळ केंद्र सरकारने लसीच्या डोसचा पुरवठा वाढवावा असे म्हटलं आहे. काल केंद्रीय आरोग्य मंत्रालायासोबत त्याबाबत चर्चा देखील झाल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सध्या 45 वर्षांपर्यंतच्या नगारिकांना सरसकट लस दिली जात आहे. पण संक्रमण हे तरूणांमध्ये अधिक असल्याने लसीकरणासाठी किमान वय 25 वर्ष करण्याची देखील आग्रही मागणी केल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावेळेस त्यांनी केंद्रासोबत रेमडीसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठा यांची माहिती दिली आहे. इतर राज्यातून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे देखील त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात रेमडीसिव्हीर लसींचा एक डोस कमाल 1100-1400 रूपयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे.     25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा; Rajesh Tope यांच्या केंद्राकडे मागण्या.

दरम्यान राज्यात रेमडीसीवीर चा काळा बाजार करू नका. केंद्र सरकारच्या माहितीनुसार विशिष्ट गटातील रूग्णांवरच रेमडीसीव्हीर वापरा असे देखील आवाहन राजेश टोपेंनी राज्यातील खाजगी आणि सरकारी रूग़्णालयांना केले आहे. मुंबई, पुणे मधील स्थिती पाहता तेथे बेड वाढवण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमाहे त्यांनी नवीन स्ट्रेन असल्याची माहिती दिली आहे. हा सट्रेन कमी वेळात अधिक लोकांना बाधित करत असल्याची माहिती दिली आहे. सध्या या स्ट्रेनचे सॅम्पल National Centre for Disease Control कडे पाठवले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आज काही वेळापूर्वी मुंबई शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील लसीचा तुटवडा असल्याचं म्हटलं आहे.