मुंबई मध्ये COVID 19 Vaccine चा तुटवडा; महाराष्ट्राला अधिक लस देण्याची महापौर किशोरी पेडणेकर यांची केंद्राकडे  मागणी
Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

मुंबई मध्ये दिवसागणिक 10 हजारांच्या वर नवे कोरोना रूग्ण आढळत असल्याने मुंबापुरी पुन्हा चिंतेमध्ये आहे. सरकार कडून कोविड 19 नियमावलीचं पालन करण्यासोबतच कोविड 19 च्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पण आता मुंबई मध्ये कोविड 19 लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याचं चित्र असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. दरम्यान काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लस पुरवठा करण्याबाबात केंद्राशी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशात सध्या लसीकरणामध्ये अव्वल असलेल्या महाराष्ट्राला कोविड 19 लसीचा अधिकचा पुरवठा करावा असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.

दरम्यान पुढील काही दिवसांत खाजगी, सरकारी लसीकरण केंद्रांवर नागरिक गेले आणि तेथे लस नसेल तर पुन्हा त्यांना केंद्रांवर आणणं कठीण होईल तसेच दुसरा डोस देणं देखील अनिवार्य असल्याने त्याचे नागरिकही खोळंबले असल्याचं पेडणेकरांनी सांगितलं आहे.

लसीकरणासोबतच सध्या सर्वत्र होत असलेला कोरोना रूग्णांचा विस्फोट पाहता नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे, अनावश्यक गर्दीची ठिकाणं टाळा आणि स्वयंशिस्त पाळा असेही महापौरांनी बजावलं आहे. सोसायट्यांमध्येही कोरोना रूग्ण आढळल्यास त्या सोसायटींच्या सेक्रेटरी, अध्यक्ष यांनी जबाबदारी घेत मजला सील करण्यात पुढाकार घेण्याचं आवाहन महापौर पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई मध्ये बीएमसी कडून 108 केंद्रांवर लसीकरण सुरू असून खाजगी हॉस्पिटल्सकडून देखील लसीकरण केले जात आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना सरसकट लस दिली जात आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ही वयाची अट 25 वर्षांपर्यंत खाली आणण्याचं आवाहन केले आहे.