यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) अवघ्या काही दिवसांवर आला आहेत. या काळात अनेक चाकरमानी लोक मुंबईवरून आपापल्या गावी जातात. ही बाब धान्यात घेऊन नागरिकांचा खड्डेमुक्त प्रवास सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे. मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळून, नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. तसेच दोन्ही महामार्गावरील बायपास, सर्व्हिस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पुढे 10 ऑगस्टनंतर दोन्ही महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी भेट देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्गाच्या सद्य:स्थितीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरुन लाखो चाकरमानी कोकणात जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. मुंबई-गोवा महामार्गावरील शक्य तेवढ्या मार्गाचे रुंदीकरण करुन वाहतूक गतिमान होईल, याकडे लक्ष द्यावे. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, दरडप्रवण असणाऱ्या परशुराम घाटात मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या धर्तीवर सुरक्षा जाळ्या लावाव्यात. ज्या भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाले असेल तेथील बांधकाम साहित्य हटवून रस्ता मोकळा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (हेही वाचा: Maharashtra Economy Bigger Than Pakistans: काय सांगता? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा मोठी; एकट्या मुंबईमध्ये राहतात 94 अब्जाधीश)
गणेशभक्तांच्या सोईसाठी महामार्गावर दर 10 किमी अंतरावर वैद्यकीय मदत कक्ष आणि वाहन दुरुस्तीची व्यवस्था करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नाशिक महामार्गाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खड्डे बुजवण्याबरोबर भिवंडी परिसरातील रस्त्यावर उभे असणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करावी. मुंबई ते नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे ओळखून त्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीने करावे, यासाठी महामार्ग प्राधिकरणाने ठाणे जिल्ह्यात वरीष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत देखील संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.