हसन मुश्रीफ (PC - Twitter)

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत (Yashwant Panchayat Raj Campaign) कोल्हापूर जिल्हा परिषदेने (Kolhapur Zilla Parishad) राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वितीय आणि सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार, प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त जिल्हा परिषदांसाठी अनुक्रमे 30 लाख रुपये, 20 लाख रुपये आणि 17 लाख रुपये व स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदूर्ग) पंचायत समितीने पटकावला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे 20 लाख रुपये, 17 लाख रुपये आणि 15 लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यशवंत पंचायत राज अभियान सन 2020-21 अंतर्गत हे पुरस्कार देण्यात आले आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी 12 मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मात्र, राज्यातील कोरोना स्थिती पाहता यंदा कार्यक्रम होणार नाही. (वाचा - Shiv Sena On WB Assembly Election 2021: ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले; पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवर शिवसेना मुखपत्रातून भाष्य)

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना विभागस्तर व राज्यस्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” पुरस्कार देण्यात येतात.

ग्रामपंचायतींसाठी स्मार्ट ग्राम व्हिलेज योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. यशवंत पंचायत राज पुरस्कार निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयांची अदलाबदल करून क्षेत्रिय पडताळणी करण्यात आली, असेही मुश्रीफ यांनी सांगितलं.

राज्यस्तरीय पडताळणी समितीने पुरस्कारांसाठी केलेल्या गुणांकनानुसार 300 गुणांपैकी राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेला 276.34, यवतमाळ जिल्हा परिषदेला 274.57 तर सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेला 264.62 गुण प्राप्त झाले. तसेच राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीसाठी 300 गुणांपैकी कुडाळ (जि. सिंधुदूर्ग) पंचायत समितीला 294.16, कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीला 287.30 तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीला 279.45 गुण मिळाले.