Coronavirus: लातूर मध्ये अखेर कोरोना विषाणूचा शिरकाव, आढळले 8 COVID-19 पॉझिटिव्ह रुग्ण
Coronavirus Outbreak | Photo Credits: IANS

कोरोना व्हायरस हा विषाणू हळूहळू महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शिरकाव करु लागलाय. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना पसरत असून केवळ लातूरमध्ये (Latur) आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही अशी बातमी कालपर्यंत कानावर येत होती. मात्र आता PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लातूरमध्ये एकाच वेळेस 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ही बातमी खूपच धक्कादायक असून शुक्रवारी निलंगा येथील जमबाग मशिदीमधून ताब्यात घेण्यात आलेल्या 12 जणांपैकी 8 जण कोरोना बाधित निघाले आहेत.

लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 3 एप्रिल रोजी रात्री 20 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. ते नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत रात्रीच पाठवण्यात आले होते. त्यापैकी बारा व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत तर उर्वरित आठ व्यक्तीचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. Coronavirus Update In India: 525 नव्या रुग्णांसह भारतातील कोरोना बाधितांची संख्या 3072 वर

या धक्कादायक घटनेने निलंगा शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर निलंग्यातील सर्व दुकाने, किराणा, भाजीपाला, फळे, दूधविक्री बंद राहील यांची नोंद घ्यावी त्याच बरोबर फक्त अत्यावश्यक कारणासाठीच नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले आहे.

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भारतातील (India) स्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. नव्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 525 नवे रुग्ण आढळले असून आता कोरोना बाधितांची संख्या 3072 वर गेली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या 3072 रुग्णांमध्ये 2784 सक्रिय केसेस असून 213 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.