
पुण्यात भरदिवसा, शहराच्या मध्यवर्ती भागात एका तरुणावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये संबंधीत तरुण जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगश धुमाळ (वय 32 रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ, पुणे) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. साधारण दुपारी साडेतीन वाजता शहराच्या मध्यवर्ती, गजबजलेल्या शुक्रवार पेठ या भागात दोन तरुणांनी मंगेशवर गोळीबार केला, त्यानंतर या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्लाही केला. या प्रकारामुळे जखमी झालेल्या मंगेशने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मंगेशला ससून रुग्णालयात दाखल केले, सध्या मंगेशवर उपचार चालू आहेत.
या हल्ल्यामध्ये मंगेशच्या पायाला गोळी लागली असून, त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने त्याला गंभीर जखम झाली आहे. पूर्ववैमनस्यातून मंगेशवर गोळीबार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु गोळीबार करणारे कोण होते, या मागे काय कारण होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने सध्या पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.