Eknath Shinde (फोटो सौजन्य - PTI)

मला हलक्यात घेऊ नका नाहीतर, मी टांगा पलटी करून टाकेन, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, मी एक सामान्य कामगार आहे, बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे आणि धडा घेतला पाहिजे. जेव्हा मला हलक्यात घेतले गेले, तेव्हा मी 2022 मध्ये टांगा उलटवला आणि सरकार बदलले. आम्ही सामान्य लोकांच्या इच्छेचे सरकार आणले. मी विधानसभेत सांगितले होते की, शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस मिळून 200 हून अधिक जागा जिंकू. आम्ही ते करून दाखवले. म्हणून, ज्यांना हे संकेत समजून घ्यायचे आहेत, त्यांनी ते समजून घेतले पाहिजेत, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मला पुरस्कार मिळाला, पवार साहेबांनी मला हा पुरस्कार दिला. एक मराठी माणूस मराठी माणसाला पुरस्कार देतो...माझ्यासारख्या कामगाराला राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. परंतु, यामुळे किती संताप व्यक्त होत आहे. तुम्ही किती जाळणार आहात, एके दिवशी तुम्ही जळून राख व्हालं. मला पुरस्कार दिल्याने शरद पवारांवर टीका करण्यात आली. ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले त्या शरद पवार साहेबांचा हा अपमान आहे. (हेही वाचा - Deputy CM Eknath Shinde Receives Death Threat: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देऊ; पोलिसांना मिळाला धमकीचा मेल, तपास सुरु)

साहित्यिकांना दलाल म्हटले गेले. त्यांचा अपमान केला. माझा अपमान करणे थांबवा. या प्रकरणाशी अमित शहा यांचे नाव जोडले गेले. हे काय चाललंय, ते सुधरतील की नाही, माहित नाही. पण तुम्ही माझ्यावर कितीही आरोप केलेत, कितीही शिव्या दिल्यात तरी, महाराष्ट्रातील जनता जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला काळजी नाही, असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.