Mumbai AQI | (Photo Credits: x/ANI)

Maharashtra Air Pollution: मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता (Air Quality) पातळी पाठिमागील काही काळापासून मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनासह त्या त्या शहरांतील प्रशासकीय आणि राजकीय मंडळी यांच्याकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. मात्र, त्याला पुरेशा प्रमाणात यश येत नव्हते. अशा वेळी निसर्गानेच राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला. मागच्या काही काळात पाऊस पडला. ज्यामुळे वातावरणातील हवेची गुणवत्ता (Air Quality Index) काहीशी सुधारली. ज्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण निसर्गाने दिलेल्या देणगीचा स्वीकार आपापल्या पद्धतीनेच करायचा या मानवी वर्तनामुळे पुन्हा एकदा वातावरण बिघडले. दिवाळी सणानिमित्त नागरिकांनी इतके फटाके फोडले की राज्यातील केवळ मुंबईच नव्हे तर इतर शहरांतीलही हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरली आहे.

वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी निश्चित वेळेचे बंधन घालून दिले होते. तरीही नागरिकंनी वेळेचे पालन करुन आणि वेळ न पाळताही इतक्या प्रमाणावर फटाके फोडले की, त्याचा वातावरणावर प्रचंड परिणाम झाला. ज्यामुळे खास करुन मुंबई आणि पुणे शहरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. शहरांतील सुधारलेली हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली.

राज्यातील शहरांतील हवेची गुणवत्ता पातळी पुढील प्रमाणे- अकोला - 180 (पीएम 10 प्रदूषक मात्रा अधिक), अमरावती - 107 (पीएम 10 प्रदूषक मात्रा अधिक), संभाजीनगर - 146 (पीएम 10 प्रदूषक मात्रा अधिक), चंद्रपूर - 215 (पीएम 2.5 प्रदूषकाची मात्रा अधिक), जळगाव - 138 (पीएम 10 ची मात्रा अधिक), कोल्हापूर - 179 (पीएम 10), नागपूर - 200 (पीएम 2.5), नाशिक - 176 (पीएम 2.5), मुंबई (सायन) - 137 (पीएम 10), नवी मुंबई - 206 (पीएम 10), पुणे - 263 (पीएम 2.5), सोलापूर - 295 (पीएम 2.5).

हवेची गुणवत्ता विशिष्ट वातावरणातील हवेची स्थिती किंवा स्वच्छता यांबाबत माहिती देते. हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेकदा नियामक उपाय, तांत्रिक प्रगती आणि जनजागृती मोहिमा यांचा समावेश होतो. सरकार आणि पर्यावरणीय एजन्सी हवेच्या गुणवत्तेची मानके स्थापित करण्यासाठी आणि प्रदूषण स्रोत कमी करण्यासाठी धोरणे लागू करण्यासाठी कार्य करतात, ज्यामुळे समुदायांसाठी आरोग्यदायी राहणीमान निर्माण होते. प्रदूषणाचे स्रोत ओळखण्यासाठी, प्रभावी हस्तक्षेपाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि सार्वजनिक आणि पर्यावरणीय आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.