Farmer Suicide: नागपुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; या महिन्यात जिल्ह्यातील पाचवा बळी
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) जिल्ह्यात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने (Debt-Ridden Farmer) आत्महत्या (Suicide) केली आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर कर्जामुळे या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येची या महिन्यातील ही पाचवी घटना आहे. या घटनेबाबत जलालखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, सोमवारी नरखेड तालुक्यातील पिंपळेदरा गावातील शेतकरी राजीव बाबुराव जुडपे हे त्यांच्या शेतात दोरीच्या मदतीने झाडाला लटकलेले आढळले.

पोलिसांनी सांगितले की, मृत शेतकऱ्याकडे अडीच एकर जमीन असून त्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. जुडपे यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्याने त्यांना खूप दुःख झाले होते. त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात यापूर्वीही पीक नासाडी आणि कर्जामुळे चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

महाराष्ट्रातील यवतमाळ परिसरातही गेल्या 43 दिवसांत कर्जबाजारीपणामुळे सुमारे 60 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन पावले उचलत असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यावर्षी अशा 205 प्रकरणांची नोंद झाली आहे. (हेही वाचा: कुपोषणामुळे यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 86 बालकांचा मृत्यू; न्यायालयाने घेतली गंभीर दखल)

ऑगस्टमध्ये 48 शेतकरी आत्महत्या झाल्या, सप्टेंबरमध्ये 12 आत्महत्या झाल्या. यावर्षी (12 सप्टेंबरपर्यंत) 205 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सरकारने आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले आहे. सरकारी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सरकारी अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना सरकारी योजना आणि लाभांची माहिती देण्यासाठी 13 आणि 14 सप्टेंबर रोजी त्यांच्यासोबत एक दिवस घालवतील.