देशात 3 जानेवारी रोजी डीसीजीआयने भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ आणि ऑक्सफोर्डची ‘कोव्हिशिल्ड’ या दोन कोरोना लसीच्या (Coronavirus Vaccine) आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने जोर धरला आहे. त्याआधी देशभरात ड्राय रन (Dry Run) आयोजित करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
2 जानेवारी रोजी पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्ह्यात तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावर कोविन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्राय रन घेतला जातो.
या मोहिमेची पूर्वतयारी करण्यात असून त्यामध्ये राज्य स्तरावरुन जिल्ह्यांचे यूजर आयडी तयार करणे, जिल्हा स्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम झाले. जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शीतसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. (हेही वाचा: पिंपरी चिंचवड शहरात इंग्लंडमधून परतलेल्या तिघांना कोरोना व्हायरस यूके स्ट्रेन संसर्ग)
या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोविन अॅप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद कोविन ॲपमध्ये करण्यात येईल.