
पुण्यात (Pune) साधारण महिनाभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली पुणे विद्यापीठ चौकातील (Pune University Square) पर्यायी वाहतूक व्यवस्था दुमजली उड्डाणपुलाचे (Double Storey Flyover) बांधकाम पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जंक्शनवरून तसेच पाषाण, बाणेर, औंध आणि गणेशखिंड रोड (एकत्रितपणे या मार्गांवर शहरातील सर्वात जास्त वाहतूक होते) यांना जोडलेल्या रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात आली आहे. दोन मजली उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि अंडरपास बांधण्याच्या प्रस्तावित कामासाठी गेल्या वर्षी 24 डिसेंबरपासून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
गणेशखिंड रोडवरील दोन उड्डाणपूल- एक पुणे विद्यापीठ जंक्शनवरील आणि दुसरा- ई-स्क्वेअरसमोरील, पाडल्यानंतर, पुणे महानगरपालिकेने (PMC) 426 कोटी रुपयांच्या एकात्मिक पायाभूत सुविधा आराखड्याला मंजुरी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दोन मजली उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय पीएमसीसह संयुक्तपणे घेतल्यावर, उड्डाणपूल पाडण्यात आले होते. या नव्या दोन माजली उड्डाण पुलावरील वरचा मजला हा हिंजवडी ते शिवाजीनगर जोडण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रो रेल्वे कॉरिडॉरसाठी असेल, तर वाहनांच्या वाहतुकीसाठी पहिला मजला असेल.
पोलिस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे म्हणाले, ‘वाहतूक प्रवाहाचे तपशीलवार विश्लेषण केल्यानंतर, आम्ही पर्यायी वाहतूक प्रवाह योजना आणली. गोलाकार वाहतूक मार्गामुळे प्रवाशांना थोडे अधिक अंतर कापावे लागणार असले तरी, या व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी नक्कीच कमी झाली आहे आणि सिग्नल सायकल जेवढी होती त्याच्या निम्म्याहून कमी झाली आहे. आता दोन माजली उड्डाणे पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत हा पर्यायी वाहतूक मार्ग चालू असेल.’ (हेही वाचा: राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा)
वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित एजन्सींनी पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास 30 महिन्यांची मुदत दिली असली तरी, साथीच्या रोगासह विविध घटकांचा विचार करून हे काम 35 ते 40 महिन्यांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. चतुश्रृंगी वाहतूक विभागाचे निरीक्षक पी.डी. मासाळकर म्हणाले, ‘पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबत आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेत राहू आणि प्रवास सुरक्षित आणि त्रासमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सर्व सूचना विचारात घेऊ.’