MCA Cricket Stadium, Pune (Photo Credit - Twitter)

पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्याकडे पाठवले आहे. या पत्रात त्यांनी एमपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आमदार रोहित पवार यांचे अभिनंदनही केले आहे. (हेही वाचा -Shashan Aaplya Dari: भरसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंना टोला)

आमदार धनंजय मुंडे यांनी या पत्राबद्दलची माहिती दिली आहे. या पत्रात त्यांनी लिहले आहे की "पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेबांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. साहेबांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास आदरणीय साहेबांचे नाव देण्यात यावे." एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांना त्यांनी ही विनंती केली आहे.

दरम्यान एमपीएल स्पर्धेचे चांगले आयोजन केल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे. एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात झाली. या स्पर्धेतील अंतिम सामना हा 29 जूनला पार पडणार आहे. अशा एकूण 15 दिवस ही स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रोहित पवार आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.