भाजप-शिवसेना महायुती ची  'ही' असू शकते संभावित मंत्र्यांची यादी; पाहा कोणाला मिळू शकतं कोणतं खातं?
Devendra Fadanvis, Aditya Thackeray (Photo Credits: Facebook/Instagram)

आज भारतीय जनता पक्षाची विधिमंडळ परिसरात एक बैठक पार पडली आणि नेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

फडणवीस यांनी सांगितल्यानुसार शिवसेना-भाजपचंच सरकार पुन्हा येणार अशा चर्चा सध्या सुरु आहेत. परंतु, शिवसेना (Shiv Sena) दावा करत असलेला सत्तावाटपाचा '50-50 फॉर्म्युला' बाजूला सारत '13-26' असा नवा फॉर्म्युला (BJP-Shiv Sena Coalition New Formula) भाजपने दिल्याचे समजते. तसेच मुख्यमंत्री पदाला घेऊन अडून बसलेल्या शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागू शकतं. इतकंच नाही तर अनेक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप पक्षाने गृह, वित्त, महसूल आणि नगरविकास ही चारही महत्त्वाची खाती शिवसेनेला न देण्याचा निर्णय घेतला आहे.

चला तर बघूया नव्या सरकार स्थापनेनंतर कोणत्या नेत्याला आणि कोणत्या पक्षाला मिळू शकतं कोणतं मंत्रिपद...

देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांची भेट घेतली आणि त्या अनौपचारिक बैठकीत तेच पुढचे पाचही वर्ष मुख्यमंत्री असतील असे स्पष्ट केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे तर उपमुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे जाऊन आदित्य ठाकरेंना ते मिळू शकतं.

गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावत, आशिष शेलार अशी मातब्बर मंडळी देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात असू शकतात. त्याचसोबत आदित्य ठाकरे, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रसिंह भोसले, गणेश नाईक, सीमा हिरे या नव्या मंडळींना देखील काही खाती मिळू शकतात.

चार महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ, महसूल, नगरविकास आणि गृह ही खाती भाजपकडेच राहू शकतात आणि त्यानुसार सुधीर मुनगंटीवार यांना अर्थ तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे गृह ही खाती जाऊ शकतात. पण त्याचसोबत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने व एकनाथ खडसे यांचे तिकीट कापल्याने त्यांची खाती कोणाकडे जातात हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

भाजप-शिवसेना युतीचा नवा फॉर्म्युला 13-26? मुख्यमंत्री, गृह, अर्थ, नगरविकास मंत्रालयं सोडून इतर पदांबाबत चर्चा होण्याची शक्यता

त्याचसोबत मंद म्हात्रे व सीमा हिरे या दोन महिला आमदारांची नावे देखील नव्या मंत्रिमंडळात असण्याची शक्यता नाकारता येत नसून पंकजा मुंडे यांच्याकडील महिला व बालविकास हे खातं देण्यात येऊ शकतं.