भाजप-शिवसेना युतीचा नवा फॉर्म्युला 13-26? मुख्यमंत्री, गृह, अर्थ, नगरविकास मंत्रालयं सोडून इतर पदांबाबत चर्चा होण्याची शक्यता
BJP-Shiv Sena Coalition New Formula | Image only representative purpose (Photo credit: File Image)

BJP-Shiv Sena Political Battle For Power: मुख्यमंत्री पदावर आडून राहिलेल्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपने नवी ऑफर दिल्याचे वृत्त आहे. शिवसेना (Shiv Sena) दावा करत असलेला सत्तावाटपाचा '50-50 फॉर्म्युला' बाजूला सारत '13-26' असा नवा फॉर्म्युला (BJP-Shiv Sena Coalition New Formula) भाजपने दिल्याचे समजते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगरविकास, अर्थमंत्रालय अशी सर्व महत्त्वाची पदं भाजपकडे राहतील. ही पदं सोडून उपमुख्यमंत्री पद आणि इतर 13 मंत्रीपदं शिवसेनाल देण्याची भाजपची तयारी असल्याचे म्हटले आहे.

राज्य कारभार करत असताना मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगरविकास, अर्थमंत्रालय ही खाती अत्यंत महत्त्वाची समजली जातात. त्यामुळे ही मंत्रालयं आपल्याकडे राहावीत असा युती आणि आघाडीतील सर्व पक्षांचा नेहमीच आग्रह असतो. त्यामुळे भाजपनेही ही मंत्रिपदं आपल्याकडे ठेवत उर्वरीत मंत्रालयं देऊन शिवसेनेची बोळवण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसते.

भाजपच्या ऑफरवर शिवसेना काय प्रतिक्रिया देते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. शिवसेनेने भाजपची ऑफर स्वीकारली तर, राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार पाहायला मिळू शकते. तर, दुसऱ्या बाजूला भाजपची ऑफर स्वीकारायची की सरकारमध्ये सहभागी न होता विरोधात बसायचे आणि सरकार अल्पमतात आणायचे असा दुहेरी विचार शिवसेनेला करावा लागणार आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी बहुमताने निवड; शिवसेना आमदारांची उद्या बैठक)

भाजप-शिवसेना पक्षात मुख्यमंत्री पद आणि सत्तावाटपाचा संघर्ष सुरु असताना काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षानेही सूचक वक्तव्य केली आहेत. शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला नाही आणि सरकार अल्पमतात आले तर, पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी विचार करेन असे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सत्तास्थापनेबाबत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आल्याचे माहितीत नाही. मात्र, तसा प्रस्ताव आल्यास आमचे पक्षश्रेष्टी आणि मित्रपक्षांशी चर्चा करण्यात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.