मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांची विधमंडळ नेता (BJP Legislature Party Leader) म्हणून भाजप आमदारांनी बहुमताने निवड केली आहे. फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यापूर्वी भाजप आमदार आणि भाजपचे केंद्रीय निरिक्षक यांच्यात विधिमंडळ परिसरात एक बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अर्थात फडणवीस यांच्या नावाची घोषणा ही केवळ औपचारीकता होती. बैठकीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड व्हावी असा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 10 आमदारांनी त्यास अनुमोदन दिले. विधमंडळ नेता निवडीपूर्वी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या वेळी भाजप आमदार डोक्याला भगवे फेटे बांधून विधिमंडळ परिसरात जमले होते. भाजपचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, अभिशेख खन्ना, भाजप महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, भाजप खासदार नारायण राणे आदी मंडळी या वेळी उपस्थित होती.
पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर लक्ष
दरम्यान, भाजपचे सर्व आमदार विधिमंडळ परिसरात उपस्थित झाले असताना पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उपस्थितांचे लक्ष होते. पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. तर, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तिकीटच दिले नव्हते. त्यामुळे हे तिन्ही नेते जेव्हा विधिमंडळ परिसरात आले तेव्हा, या नेत्यांकडे प्रसारमाध्यमांसह उपस्थितांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय पण, मुख्यमंत्री पदावर अडलंय', भाजप-शिवसेना '50-50 फॉर्म्युला' सोशल मीडिया, जनतेत थट्टेचा विषय)
Devendra Fadnavis elected as the leader of Maharashtra BJP legislative party. (file pic) pic.twitter.com/5ePWDI5kho
— ANI (@ANI) October 30, 2019
मुख्यमंत्री पद हा मुद्दा सोडून शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावे
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे हे सरकार स्थापनेबाबत सकारात्मक आहेत. मात्र, शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांनी एक एक पाऊल मागे घ्यावे आणि समन्वयाचा तोडगा काढावा असे म्हटले आहे. याच वेळी विधिमंडळ नेता म्हणून आपल्या पक्षाचा देवेंद्र फडणीस यांना पाठींबा असल्याचे म्हटले आहे.