Delhi 98th Marathi Sahitya Sammelan

नवी दिल्ली (New Delhi) येथे 71 वर्षापूर्वी 1954 साली ऑक्टोंबर महिन्यात 37 वे मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) झाले होते. तेव्हा,महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती,आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. त्यानंतर आता जवळजवळ 70 वर्षांनी यंदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. येत्या 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

यंदाच्या 98 व्या संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, अध्यक्षपदाचा मान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. या साहित्य संमेलनाला साहित्यिक, कवि, विचारवंत, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार असून, मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यक्रम-

या संमेलनात वाचन, मुलाखत, परिसंवाद असे वेगवेगळे एकापेक्षा एक सरस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

21 फेब्रुवारीला उद्घाटनानंतर सायंकाळी 6.30 वाजता दुसरे सत्र सुरु होईल. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील.

98th Marathi Sahitya Sammelan-

शनिवारी 22 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत, विशेष सत्कार सत्र, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि सायंकाळी ‘मधुरव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे.

याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभामंडप येथे ‘बहुभाषिक कवी संमेलन’, बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन व साहित्य’, ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयावर परिसंवाद आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले सभा मंडप येथे कवी कट्टा आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी शेवटच्या दिवशी 23 फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर मुलाखत, ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य, ‘नाते दिल्लीशी मराठीचे’ आदी कार्यक्रम आहेत. यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सृजनशीलता’ या विषयावर परिसंवाद आहेत. सायंकाळी ‘खुले अधिवेशन व समारोप’ असे सत्र असणार आहे. (हेही वाचा: Law Against 'Love Jihad': 'आंतरधर्मीय विवाहांमध्ये काहीही चूक नाही, परंतु फसवणुकीद्वारे होणारे संबंध थांबवले पाहिजेत'- CM Devendra Fadnavis)

दरम्यान, मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि 1878 मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले. त्यानंतर आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.