Devendra Fadnavis | (File Photo)

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) सरकार लवकरच ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) विरोधात कायदा आणणार असून, याबाबत राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती लव्ह जिहादशी संबंधित सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर चर्चा करून एक अहवाल तयार करणार आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी यावर भाष्य केले. ते म्हणाले, आंतरधर्मीय विवाहांमध्ये काहीही गैर नाही, परंतु फसवणूक आणि खोट्या ओळखीद्वारे होणाऱ्या विवाहसंबंधांविरुद्ध पावले उचलण्याची गरज आहे.

‘लव्ह जिहाद’ ही एक संकल्पना असून, हा शब्द उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी, मुस्लिम पुरुषांनी हिंदू महिलांना लग्नाद्वारे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यासाठी वापरला आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयानेही ‘लव्ह जिहाद’ च्या वास्तवाबद्दल निरीक्षणे नोंदवली आहेत. जबरदस्तीने धर्मांतर आणि 'लव्ह जिहाद'च्या प्रकरणांविरुद्ध, नवीन कायद्याच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करण्याबाबतच्या प्रश्नाला फडणवीस उत्तर देत होते.

Law Against 'Love Jihad'-

फडणवीस म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयामध्ये लव्ह जिहादची वास्तविकता प्रदर्शित केली आहे.  आता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्येही अशी प्रकरणे वाढत आहेत. आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत लग्न करणे हे चुकीचे नाही. मात्र फसवणूक करण्याच्या उद्देशाने, खोटे बोलून, खोटी ओळख दाखवून लग्न करणे आणि मुले जन्माला आल्यानंतर सोडून देणे, अशा ज्या घटना घडत आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे.’ (हेही वाचा: Law Against 'Love Jihad': फडणवीस सरकार महाराष्ट्रात आणणार 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा; सात सदस्यीय समिती स्थापन)

दरम्यान, महायुती सरकारच्या या निर्णयाचे काही ठिकाणी कौतुक होत आहे, तर काही ठिकाणी निषेधाचे आवाज उठत आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हणाले की, हे लोक देशाची संस्कृती बिघडवू इच्छितात. लोकशाहीमध्ये कोणताही धर्म पाळला जाऊ शकतो. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी म्हणाले की, ‘आपण पाहत आहोत की मुस्लिम मुलेदेखील हिंदू धर्म स्वीकारत आहेत, मुस्लिम मुली देखील हिंदू मुलांशी लग्न करत आहेत. जर हे सर्व संविधानात दिलेल्या अधिकारांखाली घडत असेल तर त्यात गैर काय आहे?’