Cyber-attack | Representational Image (Photo Credit: PTI)

Cyber Frauds in Pune: गेल्या काही वर्षांत देशात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. mumbai, दिल्ली, पुणे यांसारख्या शहरातील लोक तर वरचेवर याला बळी पडत आहेत. आता पुणे शहरातील इतर वाढत्या गुन्ह्यांबाबत आपण बातम्या वाचत असताना, शहरात वाढत्या सायबर फसवणुकीची आकडेवारी समोर येत आहे, गेल्या नऊ महिन्यांत, जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत सायबर पोलीस स्टेशनमध्ये सायबर फसवणुकीच्या किमान 163 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.. वीज बिल फसवणूक, ऑनलाइन टास्क फ्रॉड, मॅट्रिमोनी फ्रॉड आणि सेक्सटोर्शन ट्रेड मार्केट गुंतवणूक घोटाळे यासारखे घोटाळे शहरात खूप सामान्य होत आहेत.

पुणे सायबरम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, ‘कोणताही व्यवहार करताना लोकांनी योग्य प्रकारे जागरूक राहणे आवश्यक आहे. फसवणूक करणारे ऑनलाइन मार्केटप्लेसचे डमी ॲप्लिकेशन तयार करत आहेत. फसवणुकीसाठी त्यांच्याकडे विविध पद्धती आहेत.’ (हेही वाचा: Cyber Fraud Through Dating App: मुंबईत डेटिंग ॲपद्वारे 65 वर्षीय महिलेची सायबर फसवणूक; अमेरिकन नागरिक असल्याचे सांगून 1.30 कोटी रुपये लुबाडले)

‘बहुतेक गुन्हेगार हे पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे आहेत. बँकांनी एकाच खात्यातून मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि चालू खात्यांसाठी प्रक्रिया अधिक कठोर केली पाहिजे.’ त्यांनी असेही सांगितले की, सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे मुख्य ऑपरेटर बहुतेक इतर देशांतून काम करतात आणि या गुन्हेगारांचे सरासरी वय 18 ते 45 च्या दरम्यान आहे. अशी  प्रकरणे तपासाधीन आहेत आणि त्यांचे निराकरण होण्यास वेळ लागतो.

पुण्यात, गेल्या नऊ महिन्यांत सायबर पोलीस स्टेशनमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त असलेल्या सायबर फसवणुकीच्या एकूण 163 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यात ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या 24 गुन्ह्यांचा समावेश आहे. शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 1,175 हून अधिक गुन्हे (₹50 लाखांपेक्षा कमी) नोंदवले गेले आहेत. अधिकृत माहितीनुसार, 8 प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारांनी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सायबर फसवणुकीच्या माध्यमातून 163 कोटी रुपये लुटले आहेत. आजपर्यंत केवळ 91.34 लाख रुपये वसूल झाले आहेत.