कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सध्या देशात लसीकरण (Vaccination) मोहीम सुरु आहे. मात्र काही राज्यांमध्ये लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र हे त्यातीलच एक राज्य. राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) काही लसीकरण केंद्रांवर लस देणे थांबवण्यात आल्याचे कानी पडले होते. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शुक्रवारी मुंबईतील लसीकरण केंद्रांची (Vaccination Centres) यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार 15 एप्रिल, 2021 रोजी मुंबईत 124 सक्रिय लसीकरण केंद्रे आहेत. या यादीमध्ये खाजगी व सरकारी लसीकरण केंद्र तसेच महानगरपालिका अंतर्गत येणारी केंद्रेही समाविष्ट आहेत.
या यादीद्वारे दिसून येत आहे की, महानगरातील काही सर्वात प्रसिद्ध रूग्णालये लोकांना विषाणूजन्य आजाराविरुद्ध लढण्यासाठी लस देत आहेत. यामध्ये जसलोक हॉस्पिटल, वॉकहार्ट हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, कोकिलाबेन हॉस्पिटल यासंह खासगी सुविधा असलेल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचा समावेश आहे. या यादीमध्ये 72 खाजगी रुग्णालये लसीकरण केंद्र म्हणून काम करीत असल्याचे दिसून येत आहे. यासह 35 एमसीजीएम किंवा बीएमसी रुग्णालये व 17 सरकारी हॉस्पिटल या यादीमध्ये आहेत. कॅमा हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल ही लसीकरण केंद्र काम करणारी राज्य रुग्णालये आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या डॅशबोर्डनुसार, देशात आतापर्यंत लसीचे 117,223,509 डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिम 16 जानेवारीपासून सुरू झाली आणि सध्या तिचा तिसरा टप्पा सुरु आहे. आतापर्यंत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी व अॅस्ट्रॅजेनेका यांची कोविशिल्ड आणि हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेडची कोवॅक्सिन अशा दोन लसींना मान्यता देण्यात आली आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत Coronavirus रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता; 30 एप्रिलपर्यंत उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या होईल 11.9 लाख- CM Uddhav Thackeray)
दुसरीकडे मुंबईच्या हाफकिन संस्थेस (Haffkine Institute) भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.