महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत Coronavirus रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता; 30 एप्रिलपर्यंत उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या होईल 11.9 लाख- CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

सध्या देशामध्ये कोरोन विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र हे सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. राज्य सरकार अनेक उपाययोजना करून ही महामारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून म्हटले आहे की, कोविड-19 रुग्णांची संख्या राज्यात येत्या 15 दिवसांत दुप्पट होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी लिहिलेल्या पत्रात ठाकरे म्हणाले की, 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 11.9 लाख होईल. त्यांनी या पत्रात असेही म्हटले आहे की, एप्रिल अखेरपर्यंत राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता दररोज 2,000 मेट्रिक टनपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे जो सध्या 1200 मेट्रिक टन आहे.

शेजारील राज्यांमधून लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाहतुकीत अडचणी येत असल्याचे सांगून ठाकरे यांनी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत देशातील पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागातील स्टील प्लांटमधून हवाई पद्धतीने ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी मागितली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, कोविड-19 च्या वाढीच्या घटनांमुळे महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शेजारच्या राज्यात मदत मागितली होती, परंतु तेथेही मागणी जास्त असल्याने त्यांनी पुरवण्यास असमर्थता दर्शवली.

मोदींना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी रेमेडिसवीरच्या निर्यातीवरील बंदीबाबत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आणि मागणी केली की, निर्यात करणार्‍या युनिट्सला कोणतीही कायदेशीर अडथळा न येता स्थानिक बाजारात अँटी-व्हायरल औषध उत्पादन व विक्री करण्यास मान्यता मिळण्यासाठी, स्थानिक पेटंट अ‍ॅक्ट 1970 च्या कलम 92 नुसार अधिकाऱ्यांनी त्यांना परवाना मंजूर करावा. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी)

दरम्यान, राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनची घोषणा करीत अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. काल, 14 एप्रिलपासून 1 मे सकाळी 7 पर्यंत राज्यात हे निर्बंध लागू असतील.