Coronavirus: मुंबईत होणाऱ्या कोरोना व्हायरस चाचण्यांची संख्या देशात सर्वाधिक- मुंबई महापालिका
BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई (Mumbai) महापालकेकडून करण्यात येणाऱ्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या चाचण्यांची संख्या कमी झाल्याचे तसेच, कोरोनाबाधित रुग्णांची आणि मृतांची संख्या अधिक असल्याची आकडेवारी प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. काही राजकीय नेत्यांनीही चाचण्यांबाबत आरोप केला आहे. मात्र, या सर्व आरोपांचे खंडण मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबई महापालिकेवर कोरोना चाचणीबाबत केले जाणारे सर्व आरोप निराधार असून, मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रतिदिन सरासरी 4 हजार चाचण्या करते. आजही ही सरासरी कायम आहे. त्यात कोणतीही घट झाली नाही, असे महापालिका (BMC) जनसंपर्क विभागाने म्हटले आहे. तसेच मुंबई शहरात केल्या जाणाऱ्या चाचण्या या देशभरात सर्वाधिक असल्याचा दावाही महापालिकेने केला आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 3 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली तर दिनांक 11 मार्च 2020 रोजी पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. दिनांक 3 फेब्रुवारी ते 6 मे 2020 या कालावधीमध्ये मुंबईत 1 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर 1 जून 2020 रोजी 2 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. याचाच अर्थ दिनांक 6 मे ते 1 जून या अवघ्या 25 दिवसांमध्ये दररोज सरासरी 4 हजार या दराने 1 लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेना माहती देताना पुढे म्हटले आहे की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आय.सी.एम.आर.) ही देशपातळीवरील संस्था असून चाचण्यांचे निकष याच संस्थेमार्फत ठरवले जातात. त्यानुसारच मुंबईतही चाचण्या होतात. या संस्थेने वेळोवेळी निश्चित करून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महानगरपालिकेच्या वतीने कोरोना चाचण्या केल्या जातात. दिनांक 18 मे 2020 रोजी परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच सध्या चाचण्या होत आहेत. (हेही वाचा, Mission Begin Again in Maharashtra: ठाणे शहरात नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये सम विषम तारखेच्या धोरणानुसार पहा कोणत्या दिवशी कुठली दुकानं खुली राहतील याची संपूर्ण यादी!)

ट्विट

चाचण्या कमी झाल्यांचा दावा खोडून काढत महापालिकेने म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण अलीकडे कमी झाल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामध्येही तथ्य नाही. मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर भागात पूर्वी चाचणी करणाऱया वैद्यकीय प्रयोगशाळांची संख्या मर्यादित होती. ही संख्या अलीकडे वाढली आहे. स्वाभाविकच उर्वरित महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या वाढली आहे. तर मुंबईतील दररोजच्या सरासरी चाचण्यांची संख्या कायम आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत चाचण्यांची टक्केवारी पूर्वीपेक्षा कमी दिसत असली तरी वास्तवात चाचण्यांची संख्या बदललेली नाही. मुंबईत आत्तापर्यंत सुमारे 2 लाख 12 हजार चाचण्या झाल्या असून हे प्रमाण प्रति दशलक्ष 16 हजार 304 इतके आहे. हे प्रमाण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे.

मुंबईमध्ये विविध 22 वैद्यकीय प्रयोगशाळांमधून कोरोना चाचण्या केल्या जातात. यामध्ये महानगरपालिकेच्या 3, शासनाच्या 5 आणि खाजगी 14 अशा प्रयोग शाळांचा समावेश आहे. या सर्व प्रयोगशाळांची मिळून दैनंदिन चाचणी क्षमता सुमारे 10 हजार असली तरी ही संपूर्ण क्षमता एकट्या मुंबईसाठी नाही. मुंबई महानगर क्षेत्रातील बृहन्मुंबई वगळता इतर महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमधून केल्या जाणाऱया चाचण्या यासाठी देखील या प्रयोगशाळांची क्षमता उपयोगात येते. हा मुद्दा देखील लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे प्रयोग शाळा मुंबईत असल्या तरी त्या केवळ मुंबईतीलच नागरिकांच्या चाचण्या करतात, असे नाही. दैनंदिन चाचण्या करण्याची मोठी क्षमता असलेल्या तीन वैद्यकीय प्रयोगशाळा या नवी मुंबई, ठाणे येथे स्थित असून त्यांची क्षमता मुंबई वगळता इतर क्षेत्रांसाठी देखील उपयोगात येते. त्यामुळे मुंबईसाठीची क्षमता पूर्णपणे उपयोगात येत नाही, असे म्हणणे सुसंगत नाही, असेही महापालिकेने म्हटले आहे.