कोव्हिड 19 सारख्या आजाराचं थैमान जगभर पसरत असताना त्याला रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. अद्याप या आजारावर कोणतीही ठोस लस किंवा औषध नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करत असताना 'प्लाझ्मा' थेरपी देखील प्रायोगिक तत्त्वावर वापरली जात होती. मात्र दुर्देवी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी अयशस्वी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी 53 वर्षीय व्यक्तीवर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले होते. मात्र 29 एप्रिल दिवशी त्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ANI च्या ट्वीटनुसार, लीलावती हॉस्पिटलचे सीईओ डॉ. रवीशंकर यांनी ही माहिती दिली आहे. प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये लव अग्रवाल यांनी प्लाझ्मा थेरपीबद्दल माहिती देताना ही ठोस उपचार पद्धती नव्हे. यावर अजूनही आयसीएमआर कडून संशोधन सुरू असून त्यांच्या परवानगीशिवाय प्लाझ्मा थेरपीचा वापर करणं हे रूग्णाच्या आरोग्याला धोकादायक आणि बेकायदेशीर असेल. महाराष्ट्रात गाईडलाईंसनुसार प्लाझ्मा थेरपी वापरण्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार चार कोरोनामुक्त रूग्णांच्या शरीरात अॅन्टिबॉडीज आढळल्या होत्या. त्याचा वापर करून एक नायर आणि एक लीलावती हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं सांगण्यात आलं होतं.
ANI Tweet
A 53-year-old male patient, the first to undergo plasma therapy in Maharashtra passed away on 29th April: Dr Ravishankar, CEO Lilavati Hospital, Mumbai #COVID19
— ANI (@ANI) May 1, 2020
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजारांच्या पुढे तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांनी 10 हजारांचा टप्पा पार केला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहे. मुंबई, पुणे, नागपूर, मालेगाव ही कोरोनाची हॉटस्पॉट्स असून येथे सर्वाधिक रूग्ण आहेत.