Plasma Donation| Image Used For Representational Purpose Only| Photo Credits: IANS

महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांचा दर आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासन आणि सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या COVID 19 या आजारावर अद्याप ठोस लस किंवा औषध नसल्याने आता अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये असणार्‍या रूग्णांवर प्लाझ्मा थेरपी वापरून उपचार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्र राज्यात प्लाझ्मा थेरपीला ICMR कडून परवानगी देण्यात आल्यानंतर मुंबई, पुण्यात प्लाझ्मा थेरपीच्या उपचारांना वेग आला आहे. बीएमसीने आज (27 एप्रिल) ट्वीटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, 4 कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांच्या रक्तामध्ये अ‍ॅन्टिबॉडीज आढळल्याने आता त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा वापरून अत्यावस्थ असलेल्या रूग्णांना जीवनदान देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती.  

दरम्यान प्रशासनाकडून कोरोनामुक्त झालेल्यांना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे त्यांच्या शरीरातील अ‍ॅन्टीबॉडिजचा वापर करून इतर रूग्णांना वाचवण्यात मोठं यश येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या मृत्यूमुखी पडणार्‍यांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृद्यविकार अशा आजारांची गुंतागुंत असणार्‍या रूग्णांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपी अशांसाठी सद्यस्थितीमध्ये मोठा आशेचा किरण आहे.

BMC Tweet

कोरोना व्हायरसची बाधा झाल्यानंतर रूग्णाच्या शरीरात विशिष्ट कालावधीमध्ये अ‍ॅन्टिबॉडीज तयार होतात. शरीर त्याच्या मदतीने कोरोनाचा सामना करत असतो. दरम्यान कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही काळ त्या रूग्णाच्या शरीरात राहतात. आता अशाच कोरोनामुक्त रूग्णाच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर अ‍ॅन्टीबॉडिज असणार्‍यांच्या शरीरातून प्लाझ्मा विलग करून तो अत्यावस्थ रूग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जाणार आहे. दरम्यान दिल्लीमध्ये या प्लाझ्मा थेरपीच्या 4 ट्रायल्सना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सध्या आरोग्यक्षेत्रामध्ये प्लाझ्मा थेरपीने भारतातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांचा दर आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ पुण्यातील ससून हॉस्पीटलमध्येही प्लाझ्मा थेरपीसाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान काल रात्री देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8068 वर पोहचला तर 342 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहराने कोरोनाबाधितांचा 5000 चा टप्पा पार केला आहे.