Pune: काँग्रेस कार्यकर्ता समीर मुनीर याच्यावर गोळीबार, जागीच मृत्यू; पुणे येथील घटना
Firing | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) येथे एका काँग्रेस कार्यकर्त्याची (Congress Activists) गोळ्या झाडून हत्या केल्याचे वृत्त आहे. ही घटना पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याचे समजते. घटनेची माहिती कळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. समीर मुनीर (Sameer Muneer) हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो काँग्रेस पक्षाचा सक्रीय सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, विद्यापीठ परिसरात ही घटना घडल्याने विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांची घटनास्थळी गर्दी पाहायला मिळाली. रस्त्यांवरही गर्दी असल्याने काही काळ वाहतूक कोंडीही झाल्याचे पाहायला मिळाले.

रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हल्लेखोरांनी समीर मुनीर याच्यावर एकूण सहा गोळ्या फायर केल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी समीर याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली की, चहा पिण्यासाठी समिर हा पुण्यातील चंद्रभागा चौक येथे आला होता. या वेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी समीर याच्यावर गोळीबार केला. समिर याच्यावर एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Hingoli Murder Case: हिंगोलीमध्ये दारुच्या सवयीला कंटाळून पत्नी आणि मुलांनी केली शेतकऱ्याची हत्या, तिघांना अटक)

समीर मुनीर यांच्यावर काँग्रेस पक्षाने बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून निवड केली होती. नुकताच त्यांनी पदभारही स्वीकारला होता. याशिवाय काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये त्यांच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मुनीर यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.