
Mumbai: सोमवारी पहाटे मुंबईत (Mumbai) एका कारला आग (Fire) लागल्याने दोन भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय या अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. माटुंगा परिसरातील बीए रोडवर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाहनातील प्रवासी पार्टी करून जॉयराईडला जात असताना सीएनजी कार रस्ता दुभाजकाला धडकली. एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, कार दुभाजकाला धडक्यानंतर कारला आग लागली. त्यातील प्रवाशांना गाडीतून बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. काही स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
प्रेम वाघेला (18) आणि अजय वाघेला (20) अशी या अपघातात मृत झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. सायन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कारमधील सर्व प्रवासी मानखुर्द उपनगरातील रहिवासी आहेत. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हला ते पार्टीनंतर जॉयराईडसाठी जात होते. (हेही वाचा - Air Asia Flight Emergency Landing: थोडक्यात बचावले 168 प्रवाशांचे प्राण, एअर एशियाच्या विमानाचे कोचीमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग)
घटनेदरम्यान, कारच्या डाव्या बाजूच्या दोन्ही दरवाजांचे लॉक जाम झाले. त्यामुळे गाडीतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. कारमधील हर्ष कदम (20) हा 60 ते 70 टक्के भाजला असून दुसरा प्रवासी हितेश भोईर (25) आणि चालक कुणाल अत्तार (25) यांना गंभीर दुखापत झाली आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताचं आगीवर नियंत्रण मिळवलं. या अपघातात जखमी झालेल्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातग्रस्त कारही सीएनजी कार होती. कार रस्त्याच्या दुभाजकावर धडकल्याने तिला आग लागली. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.