Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी (Farmer) हवालदिल झाला असून अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे संवाद साधणार आहे. मुख्यमंत्री आज अहमदनगर (Ahmednagar) आणि धाराशीव (Dharashiv)  जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, या शेतकऱ्यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहे. त्यांच्याशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न देखील करणार आहे.

काल नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी 10 वाजता पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी करतील. मुख्यमंत्री दुपारी दोन वाजता धाराशीव जिल्ह्यातील धारुर आणि दुपारी तीन वाजता वाडीबामणी या गावात नुकसानाची पाहणी करणार आहेत. काल वादळी वारा आणि गारपीटीमुळं बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले.

 

मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळं शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते.