Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Rains Update: राज्य सरकार प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट का दाखवत आहे? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकारने राज्यांचे पैसे जर वेळेवर दिले तर राज्यांना केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे सध्या सोलापूर (Solapur) दौऱ्यावर (Uddhav Thackeray Saulapur Visit) आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत. या वेळी अक्कलकोट येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे शेतकऱ्यांचे राज्य आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांना नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला जे जे शक्य आहे ते सर्व केले जाईल. राज्यात कधी नव्हे तो इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे या संकटातून सावरायला थोडासा अवधी लागेल. परंतू, दोन-तीन दिवसांमध्ये पाहणी करुन योग्य ती मदत केली जाईल, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.

राज्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. शिवाय विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा बारामती दौऱ्यवर आहेत. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौ-यावर, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार)

शरद पवार यांनी उस्मानाबाद येथे बोलताना सांगितले की, कोणतीही दुर्घटना घडली तर तत्काळ मदत देता येते. परंतू, त्यासाठी आगोदर पाहणी, पंचनामे करावे लागतात. सरसकट मदत करता येत नाही. लोकशाही देशामध्ये प्रशासकीय पद्धत पाळावी लागते. कारण दिल्या जाणाऱ्या मदतीला काहीतरी आधार आसावा लागतो, असे पावर म्हणाले. गेल्या काही दिवासांपासून पंचनामे नंतर करा आगोदर शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी अनेकांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार बोलत होते.