CM Uddhav Thackeray | (Photo Credits: YouTube)

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात नागरिकांचे तसेच शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. फळबागा, पिकं या पावसाच्या तडाख्यात बेचिराख झाली असून अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत या भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत करण्याच्या हेतूने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौ-यावर जाणार आहेत. यात आज ते सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणीदौरा करतील. तर उद्या मराठवाड्याचा पाहणीदौरा करतील.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. अशा स्थितीत येथील जनतेला काही आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्र्यांचा आज आणि उद्या असा 2 दिवस पाहणीदौरा असणार आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवलेल्या भागाचा पाहणीदौरा करुन मुख्यमंत्री येथील ग्रामस्थांची आणि शेतक-यांची भेट घेतील. त्यानंतर अधिका-यांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत काही मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न करतील. महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी NCP अध्यक्ष शरद पवार घेणार पंतप्रधानांची भेट, केंद्राकडे करणार भरीव मदतीची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना व्हायरसच्या काळात घराबाहेर न पडता घरातून सर्व कामे करत होते. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टिका होत होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा ऑनफिल्ड उतरून पाहणी दौरा सुरु करणार आहे.

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाचा मुक्काम आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर कमी होतो. मात्र यंदा हा पाऊस 21 ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.