महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी NCP अध्यक्ष शरद पवार घेणार पंतप्रधानांची भेट, केंद्राकडे करणार भरीव मदतीची मागणी
Sharad Pawar| Photo Credits: Twitter ANI

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आजपासून सलग 2 दिवस मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची ते पाहणी करणार आहेत. त्यात आज त्यांनी उस्मानाबाद, लोहारा, उमरगा, तुळजापूर येथील ठिकाणांची पाहणी केली. पावसामुळे ज्यांच्या घरांची पडझड झाली, ज्यांचे शेतीचे नुकसान झाले वा अन्य आर्थिक नुकसान झाले अशा सर्वांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी नुकसानग्रस्त नागरिकांना दिले. त्याचबरोबर यासाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे आपण केंद्र सरकारची मदत घेणार आहोत. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आलेल्या परतीच्या पावसाने येथील नागरिकांचे, शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले. 'शेतकर्‍यांचं नुकसान मोठे आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करणं आवश्यक आहे. मात्र मदत करण्यासाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे' यासाठी आपण स्वत: काही खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून मराठावाडा दौरा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा

'अतिवृष्टीमुळे तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि परंडा परिसरात मोठे नुकसान झाले आहे. पिकांसोबत शेतीतील मातीही वाहून गेली आहे. हे मोठं संकट आहे. सरकारनं अशा काळात खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे रहायला हवं. आपण त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आहोत' असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा 2 दिवसीय मराठवाडा दौरा असून आज आणि उद्या मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत. रब्बीच्या पेरणीपूर्वी पंचनामे करून आर्थिक मदत द्या, अशी विनंती यावेळी अनेक शेतकर्‍यांनी पवार यांच्याकडे केली. यावर पंचनाम्यासाठी येणार्‍या अधिकार्‍यांना नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती द्या, अशा सूचना शरद पवार यांनी शेतक-यांना दिल्या आहेत.